2008 नंतर जन्मलेल्या मुलांना खरेदी करता येणार नाही तंबाखू-सिगारेट
@ वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडमध्ये 2008 नंतर जन्मलेल्या मुलामुलींना स्वतःच्या आयुष्यात कधीच सिगारेट तसेच अन्य तंबाखूजन्य उत्पादने देशात खरेदी करता येणार नाहीत. यासंबंधी न्यूझीलंडच्या संसदेत मंगळवारी एक कायदा संमत करण्यात आला आहे. या निर्णयामुळे न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेला 26 हजार 400 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. न्यूझीलंड सरकार देशाला सिगारेट-तंबाखूपासून मुक्त करू पाहत आहे.
या कायद्यामुळे तंबाखू खरेदी करणाऱया लोकांची संख्या दरवर्षी कमी होत जाणार आहे. 2008 नंतर जन्मलेल्या मुलामुलींना स्वतःच्या आयुष्यात कधीच न्यूझीलंडमध्ये सिगारेट-तंबाखू खरेदी करता येणार नाही. परंतु नव्या कायद्याच्या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी घालण्यात आलेली नाही, ई-सिगारेट तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय हाते आहे.
धूम्रपानरहित भविष्याच्या दिशेने पाऊल
न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्री आयशा वेर्राल यांनी संसदेत हे विधेयक मांडले आहे. हे विधेयक म्हणजे ‘धूम्रपानरहित भविष्या’च्या दिशेने एक पाऊल उचल्याचे त्यांनी म्हटले आहे. हजारो लोक आता दीर्घ आणि चांगले जीवन जगू शकतील. लोकांना धूम्रपानामुळे उद्भवणारे आजार होणार नाहीत. तसेच यामुळे न्यूझीलंडच्या आरोग्य व्यवस्थेची 26 हजार 400 कोटी रुपयांची (3.2 अब्ज डॉलर्स) बचत होणार असल्याचे वेर्राल यांनी म्हटले आहे.
लोक सर्वात कमी धूम्रपान करणाऱया देशांमध्ये न्यूझीलंडचा समावेश आहे. शासकीय डाटानुसार तेथील केवळ 8 टक्के लोकच प्रतिदिन धूम्रपान करतात. मागील वर्षी ही संख्या 9.4 टक्के इतकी होती. धूम्रपानरहित वातावरण विधेयक संमत झाल्याने धूम्रपान करणाऱयांच्या संख्येत 5 टक्क्यांची घट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सिगारेट विक्रेत्यांची संख्या घटणार
या विधेयकामुळे सिगारेट विकणाऱया दुकानदारांची संख्याही कमी होणार आहे. न्यूझीलंडमध्ये सध्या 6 हजार दुकानदार सिगारेटची विक्री करत आहेत. विधेयकानंतर केवळ 600 लोकच सिगारेट विकू शकतील. तसेच तंबाखू उत्पादनांमध्ये निकोटीन पातळी कमी करण्यात येणार असून यामुळे लोकांना याचे व्यसन जडणार नाही.
विधेयकावर टीका देखील
परंतु या विधेयकावर टीका देखील होत आहे. संसदेत 10 सदस्य असलेल्या ऍक्ट पार्टीने या विधेयकामुळे तंबाखू उत्पादनांचा काळाबाजार सुरू होत छोटी दुकानांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे म्हटले आहे. लोकांनी धूम्रपान करावे असे कुणालाच वाटत नाही, परंतु विधेयकामुळे समस्या निर्माण होतील असे ऍक्ट पार्टीचे उपनेते ब्रूक वान वेल्डेन यांनी विधान केले आहे.









