कसबा बावडा / सचिन बरगे :
कसबा बावड्यात काही तरुण दारू, गुटखा, माव्याच्या व्यसनाबरोबर आता गांजाच्या धुरात अडकली असून युवा पिढी व्यसनाधीन झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या ना त्या कारणाने लहान वयोगटातील मुलांसह तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन कधी टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. सहज उपलब्ध होणाऱ्या गांजामुळे सर्वत्र नशेचा धूर पसरला आहे.
अलीकडच्या काळात तरुणांमध्ये गुटखा, मावा आणि आता गांजाचे व्यसन झपाट्याने वाढत चालले आहे. ‘कूल’ दिसण्यासाठी आणि तणावमुक्त होण्याच्या भ्रमात अनेक तरुण या धोकादायक मार्गाकडे वळत आहेत. मात्र हा चटका त्यांच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर गंभीर परिणाम करत आहे. स्पर्धात्मक आणि धावपळीच्या युगात ताण-तणावाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कसबा बावड्यातील काही तरुण दारू, गुटखा, मावा आणि गांजाच्या आहारी जाऊन बरबाद होताना दिसत आहेत. यावर वेळीच प्रतिबंध घातला नाही तर सध्याच्या युवा पिढीचे कर्तव्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
- सहजपणे मिळतो गांजा
कसबा बावड्यात आता अवैद्य गुटखा, मावा विक्रीबरोबरच गांजाची विक्री जोरात होताना दिसत आहे. येथील भाजी मंडई येथील पान टपरीवर सहजपणे उपलब्ध होत असलेली गांजाची पुडी दोनशे रुपयात मिळते. गोळीबार मैदान, रेणुका मंदिर येथील शंभर फुटी मार्ग, साखर कारखान्याचा गाडी अड्डा अशा ठिकाणी विशीतले तरुण गांजाची नशा करताना दिसतात. दिवसभर नशेत असलेल्या या तरुणाईचे शिक्षण तसेच कामधंद्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्याचबरोबर आरोग्याची नासाडी करून घेत आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेले काही तरुण नैराश्येतून टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. यावर वेळीच पायबंध घातला नाही तर युवा पिढीचे आयुष्य गांजाच्या धुराबरोबर विरळ व्हायला वेळ लागणार नाही.
- गुटखा बंदी फक्त कागदावरच… प्रत्यक्षात विक्री जोमात
गुटख्यावर बंदी असतानाही बावड्यात गुटखा विक्री जोमात सुरू आहे. कसबा बावड्यात पान टपरी सह आता किराणामाल दुकानातही चढ्या दराने गुटखा विक्री केला जातो. प्रशासनाने यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
- आरोग्यावर गंभीर परिणाम
डॉक्टरांच्या मते, गांजाचे व्यसन केवळ मानसिक नव्हे तर शारीरिक आरोग्यावर देखील घातक परिणाम करते. दीर्घकाळ गांजाचे सेवन केल्यास स्मरणशक्ती कमी होणे, नैराश्य तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन झोपेचे विकार आणि अनेक शारीरिक व मानसिक आजार होऊन आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
-डॉ. उमेश कदम (एम. डी. मेडिसिन)
- पालक व समाजाने सजग राहावे
सामाजिक कार्यकर्ते आणि मानसोपचारतज्ञांचे म्हणणे आहे की, गांजाच्या वाढत्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधावा, त्यांच्या सवयींकडे लक्ष द्यावे. शाळा आणि महाविद्यालयांनी देखील याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.
-मानसिंग जाधव (सामाजिक कार्यकर्ते)
- पोलिसांची कारवाई सुरूच
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुंगीचे इंजेक्शन आणि गांजा विक्री करणाऱ्यांवर नुकतीच कारवाई केली आहे. हे व्यसन केवळ कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हा नसून समाजासाठीही एक मोठा धोका आहे. गांजाची विक्री व सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे.
-संतोष डोके (पोलिस निरीक्षक – शाहूपुरी)








