उद्यमबागमध्ये कचरा जाळल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा
बेळगाव : उद्यमबाग येथील बेम्को कारखान्या जवळील महानगरपालिकेच्या खुल्या जागेत कचऱ्याला आग लावण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे परिसरात प्रचंड धूर पसरला जात असून औद्योगिक वसाहतींना त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच वेळा ये-जा करणाऱ्या वाहनांचे या धुरामुळे अपघात होत असल्याने हे प्रकार तात्काळ थांबवावेत, अशी मागणी उद्योजकांमधून केली जात आहे. मनपाच्या खुल्या जाग्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून परिसरातील कचरा टाकण्यात आला आहे. केवळ कचराच नाही तर जुने सोफासेट, प्लास्टिक तसेच इतर साहित्य या ठिकाणी फेकण्यात आले आहे. वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्याला आग लावली जात आहे. प्लास्टिक, रबर यासह औद्योगिक वसाहतीतील वेस्ट कचऱ्यामध्ये असल्याने परिसरात प्रचंड धूर पसरत आहे. त्यामुळे कारखान्यात काम करणाऱ्यांना या धुराचा सामना करावा लागत आहे. कचऱ्यासोबत परिसरातील झाडांनाही आग लावली जात आहे. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील उद्योजकांकडून केली जात आहे.









