निवडणूक रॅलीदरम्यान घटना : फुमियो किशिदा सुरक्षित, संशयिताला अटक
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर शनिवारी सकाळी एका व्यक्तीने स्मोकबॉम्बद्वारे हल्ला केला. जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, किशिदा एका निवडणूक रॅलीत भाषण देण्यासाठी वाकायामा शहरात पोहोचले असता स्फोटामुळे एकच गोंधळ उडाला. त्यांच्या दिशेने स्मोक बॉम्ब फेकल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने पंतप्रधानांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच संशयित हल्लेखोराला पकडण्यात आले. हल्ल्याच्या घटनेनंतर सुरक्षेची तपासणी केल्यानंतर काही वेळाने पंतप्रधान किशिदा यांनी आपले भाषण पूर्ण केले. या हल्ल्याच्या निमित्ताने माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत झालेल्या हल्ल्याच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
या घटनेचे काही फोटो-व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये सुरक्षा कर्मचारी संशयित हल्लेखोराला पकडून ठेवताना दिसत आहेत. सध्या पोलिसांनी हल्लेखोराशी संबंधित कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच त्याचे नावही जाहीर करण्यात आलेले नाही. हल्लेखोराला आम्ही अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीअंतीच तो कोण आणि त्याने हल्ला का केला हे समजेल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. हल्लेखोर तऊणाला कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. जपानमध्ये अशा गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत तुऊंगवास आणि 3 लाख ऊपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
कनिष्ठ सभागृहाच्या पोटनिवडणुकीसाठी पंतप्रधान किशिदा सध्या प्रचार करत आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सभास्थळी स्फोट झाला. यानंतर पंतप्रधान किशिदा यांनी वाकायामा शहरात दुपारी एकच्या सुमारास भाषण पूर्ण केले. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात उरायसू आणि इचिकावा शहरात जाऊन त्यांनी प्रचारसभांना संबोधित केले. फुमियो किशिदा 2021 मध्ये जपानचे पंतप्रधान झाले. यासोबतच ते लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे (एलडीपी) अध्यक्ष आहेत. 2012 ते 2017 पर्यंत त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिले. तसेच 2017 मध्ये त्यांनी जपानचे कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते.
शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याची आठवण
गेल्यावषी 8 जुलै रोजी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची एका निवडणूक रॅलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नारा शहरातील एका चौकात सभा सुरू असताना आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोराने डागलेली बंदुकीची गोळी थेट शरिरावर लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर इस्पितळात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. या घटनेनंतर सुरक्षा दलाने हल्लेखोर तऊणाला तातडीने अटक केली होती.









