अॅशेस मालिका, दुसरी कसोटी दुसरा दिवस : रॉबिन्सन, टंग यांचे प्रत्येकी 3 बळी, इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर
वृत्तसंस्था /लंडन
अॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेतील येथील लॉर्डस् मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात स्टिव्ह स्मिथच्या दमदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात 416 धावा जमविल्या. इंग्लंडने पहिल्या डावात चहापानापर्यंत चोख प्रत्युत्तर देताना 1 बाद 145 धावा जमविल्या होत्या. डकेट 62 तर पोप 32 धावांवर खेळत होते. पाच सामन्यांच्या या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून इंग्लंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. लॉर्डस्च्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावाला चांगली सुरुवात केली होती. पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने 5 बाद 339 धावा जमविल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये सलामीच्या वॉर्नरने 88 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 66, लाबुशेनने 93 चेंडूत 7 चौकारांसह 47, ख्वाजाने 2 चौकारांसह 17 धावा तसेच हेडने 73 चेंडूत 14 चौकारांसह 77 धावा जमविल्या. ग्रीनला मात्र खाते उघडता आले नाही. स्मिथ आणि हेड या जोडीने चौथ्या गड्यासाठी 108 धावांची शतकी भागिदारी केली. स्मिथच्या चिवट फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला खेळाच्या पहिल्या दिवशी 300 धावांचा टप्पा ओलांडता आला.
ऑस्ट्रेलियाने 5 बाद 339 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे 5 गडी 77 धावांची भर घालत तंबूत परतले. गुरुवारी खेळाला प्रारंभ झाल्यानंतर स्टिव्ह स्मिथने आपले शतक 169 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने झळकाविले. ब्रॉडने कॅरेला पायचीत केले. त्याने 43 चेंडूत 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. अँडरसनने स्टार्कला बेअरस्टोकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 6 धावा जमविल्या. इंग्लंड संघात कसोटी पदार्पण करणाऱ्या टंगच्या गोलंदाजीवर डकेटने शतकवीर स्मिथचा झेल टिपला. स्मिथने 184 चेंडूत 15 चौकारांसह 110 धावा झळकाविल्या. रॉबिन्सनने लियॉनला 7 धावांवर तर हॅझलवूडला 4 धावांवर बाद करुन ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव उपाहारापूर्वीच 100.4 षटकात 416 धावांवर रोखला. कर्णधार कमिन्स 2 चौकारांसह 22 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडतर्फे नवोदित जोस टंग आणि रॉबिन्सन यांनी प्रत्येकी 3 तर रुटने 2 तसेच अँडरसन आणि ब्रॉड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपल्यानंतर इंग्लंडने उपाहारापर्यंत पहिल्या डावात 4 षटकात बिनबाद 13 धावा जमविल्या. इंग्लंडने खेळाच्या दुसऱ्या सत्रात आक्रमक फलंदाजी केली. क्रॉले आणि डकेट या सलामीच्या जोडीने 17.5 षटकात 91 धावांची भागिदारी केली. इंग्लंडचे अर्धशतक तसेच क्रॉले आणि डकेट यांची अर्धशतकी भागिदारी 61 चेंडूत फलकावर लागली तर शतक 121 चेंडूत फलकावर लागले. चहापानापूर्वी ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज लियॉनने इंग्लंडची ही सलामीची जोडी फोडली.
स्टीव्ह स्मिथने ओलांडला 15000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा
इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या दुसऱ्या अॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ 15 हजारी मनसबदार झाला आहे. वैयक्तिक 84 धावांवर असताना त्याने हा टप्पा ओलांडला आहे. तसेच यापुढे जात त्याने शानदार शतकी खेळी साकारली. स्मिथने यादरम्यान आपल्या 15000 आंतरारष्ट्रीय आणि 9000 कसोटी धावांचा टप्पाही पार केला. विशेष म्हणजे, तो 15000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा 41 वा खेळाडू ठरला आहे. या 41 खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे सर्वाधिक 9 खेळाडू आहेत. 8 फलंदाजांसह भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. स्मिथच्या या कामगिरीमुळे 15 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडीज यांच्या प्रत्येकी 5-5 फलंदाजांनी 15000 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येक 4-4 फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा टप्पा गाठणारे फलंदाज
ऑस्ट्रेलिया : रिकी पाँटिंग, स्टीव्ह वॉ, अॅलन बॉर्डर, डेव्हिड वॉर्नर, मायकेल क्लार्क, मार्क वॉ, अॅडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, स्टीव्ह स्मिथ. भारत : सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, सौरव गांगुली, एमएस धोनी, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मोहम्मद अझहरुद्दीन.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया प. डाव 100.4 षटकात सर्व बाद 416 (स्टिव्ह स्मिथ 110, वॉर्नर 66, ख्वाजा 17, लाबुशेन 47, हेड 77, कॅरे 22, कमिन्स नाबाद 22, लियॉन 7, स्टार्क 6, हॅझलवूड 4, अवांतर 38, रॉबिन्सन 3-100, टंग 3-98, रुट 2-19, अँडरसन 1-53, ब्रॉड 1-99), इंग्लंड प. डाव 30 षटकात 1 बाद 145 (क्रॉले 48, डकेट खेळत आहे 62, पोप खेळत आहे 32, अवांतर 3, लियॉन 1-28). (धावफलक चहापानापर्यंत)









