कर्मचाऱ्यांच्या हास्याचे होतेय मोजमाप
घरानंतर कार्यालयातच माणूस सर्वाधिक काळ घालवित असतो. अशास्थितीत तेथील वातावरण आनंदी असणे किंवा किमान अनुकूल असणे आवश्यक आहे. अनेक देशामंध्ये टार्गेट पूर्ण न झाल्यास दिल्या जाणाऱ्या शिक्षा किंवा राजीनामा मिळविण्यासाठी केला जाणारा छळ धक्कादायक असतो.
कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसोबतचे वर्तन आणि कामाच्या ताणाबद्दल अनेक वृत्तं समोर येत असतात. परंतु जपानमधील सुपरमार्केट चेन एऑन स्वत:च्या कर्मचाऱ्यांच्या हास्याचे मोजमाप करत आहे, जेणेकरून कर्मचारी स्वत:च्या कामाकरता योग्य असावा.
जपानचे सुपरमार्केट चेन एऑनने एक आर्टिफिशिल इंटेलिजेन्स सिस्टीम तयार केली असून ती कर्मचाऱ्यांच्या हास्याचे विश्लेषण करेल आणि कर्मचाऱ्याने किती आणि कसे हसावे हे सांगणार आहे. 1 जुलैपासून ही सिस्टीम कार्यान्वित झाली आहे. अशाप्रकारचा उपाय योजणारी एऑन ही जगातील पहिली कंपनी ठरली आहे. देशभरात 250 स्टोअर्स असणाऱ्या या सुपरमार्केटकडून ‘मिस्टर स्माइल’ नावाच्या सिस्टीमचा वापर केला जात आहे.
या सिस्टीमची निर्मिती जपानची टेक कंपनी इन्स्टाव्हीआरने केली आहे. शॉप असिस्टंटचा सर्व्हिस अॅटिट्यूड कसा असावा हे या सिस्टीमकडून सांगितले जाणार आहे. चेहऱ्यावरील हावभाव, आवाज आणि अभिवादनाच्या पद्धतीशी निगडित यात एकूण 450 एलिमेंट्स तयार करण्यात आले आहेत. यात चॅलेजिंग स्कोर्स असतील, तर कर्मचाऱ्यांना एका गेमप्रमाणे परस्परांवर मात करण्यासाठी उत्साहित केले जाणार आहे. या सिस्टीमचा 8 स्टोअर्सच्या 3500 कर्मचाऱ्यांवर वापर करण्यात आला आणि 3 महिन्यात ही सिस्टीम उपयुक्त ठरल्याचे आढळून आले.









