विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात : पालक, ग्रामस्थांमधून तीव्र संताप : अशुद्ध-रसायनमिश्रित पाण्यामुळे पिके खराब, पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
तुरमुरी कचरा डेपोतून खाली सखल भागाकडे वाहत येणारे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी ग्रामस्थांनी अडवून रामलिंग मंदिराच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारीतून सोडले. पुढे हे पाणी बेळगाव-वेंगुर्ले मार्गाकडे व शाळेच्या दिशेने सोडल्याने सदर पाण्याचा मोठा लोंढा रामलिंग हायस्कूल, तुरमुरी आणि प्राथमिक मराठी शाळेच्या बाजूनी वाहू लागले. दरम्यान, सदर पाणी प्राथमिक मराठी शाळेच्या समोर येऊन साचल्याने पाण्याची प्रचंड दुर्गंधी पसरली असून येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे पालक, ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तुरमुरी गावाशेजारील टेकडीवर कचरा डेपो आहे. बेळगाव शहरातील सर्व कचरा व घाणीचे ढिगारे येथे साठविण्यात आले आहेत. या कचरा डेपोतून या भागात झालेल्या पावसामुळे कचरा कुजून दलदल निर्माण झाली आहे. तसेच डेपोमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी लहान पाण्याच्या टाक्यातून पाणी साठवले आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी तुरमुरी, बाची, कोनेवाडी गावांच्या दिशेने खाली वाहत असते. बुधवारी मुसळधार पावसामुळे सदर टाक्या भरून कचऱ्यातून दुर्गंधीयुक्त पाणी टेकडीवरून लोंढ्याच्या स्वरूपात खाली वाहू लागले आहे. सदर पाणी तुरमुरी गावात शिरत होते. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने या पाण्याचा बंदोबस्त करून सदर पाणी रामलिंग मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारीतून बेळगाव-वेंगुर्ले मार्गाकडे सोडले. मात्र याच मार्गावरती रामलिंग हायस्कूल आणि प्राथमिक मराठी शाळा असल्याने या शाळांच्या बाजूने पाण्याचा लोंढा मराठी शाळेसमोरील गेटपाशी येऊन साचल्याने तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना बुधवारी शाळेत प्रवेश करताना या पाण्याच्या दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ आली. सदर पाण्याला पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी शाळेसमोर साचल्याने दुर्गंधीमध्ये अधिकच भर पडली असून विद्यार्थी, पालक व ग्रामंस्थाना या दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. परिणामी य पाण्यामुळे रोगराईला प्रारंभ होईल आणि जनतेचे आरोग्य बिघडेल याची चिंता सतावत आहे.
कोवळ्या पिकांचे नुकसान
कचरा डेपो असलेल्या टेकडीच्या पायथ्यालगत कोनेवाडी, उचगाव, बाची, तुरमुरी गावाच्या ग्रामस्थांची शेती आहे. सध्या भुईमूग, बटाटे, रताळी, भात, ऊस, मका, जोंधळा व इतर भाजीपाला अशी कोवळी पिके जमिनीतून वर डोकावत असतानाच नेमके याचवेळी या कचरा डेपोतील अशुद्ध व रसायनमिश्रित पाणी या पिकातून मिसळत आहे. त्यामुळे ही पिके खराब होणार अशी भीती शेतकरी वर्गामध्ये पसरली आहे.
बेळगाववासियांचे आरोग्यही धोक्यात
सदर दूषित पाण्याचा साठा ज्यादा झाल्यानंतर साहजिकच जवळून वाहणाऱ्या नाल्यात मिसळून नंतर हे पाणी नाल्याद्वारे मार्कंडेय नदीत मिसळत असते. हेच दूषित पाणी हिंडलगा पंपिंग स्टेशनद्वारे बेळगाव शहराला पुरविले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका पोहोचणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तरी या पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कोणाची तरी घाण कोणीतरी सहन करायची- परशराम अष्टेकर
कोणाची तरी घाण कोणीतरी सहन करायची, हा कोणता न्याय? आम्हा ग्रामस्थांचे आज आरोग्य धोक्यात आले आहे. आमच्या मुला-बाळांना जर रोगाने ग्रासले तर याला जबाबदार कोण? आरोग्य खात्याने तुरमुरी अथवा या परिसरातील गावाकडे आतापर्यंत आरोग्याच्या दृष्टीने कोणत्या योजना राबवल्या नाहीत. किती जणांचे आरोग्य तपासले हा संशोधनाचा विषय आहे. यासाठी तातडीने यावर उपाययोजना कराव्यात.
नागरिकांचे आरोग्य चालले बिघडत- मल्लाप्पा मेघोचे
कचरा डेपोमुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. दुर्गंधीमुळे जगणे मुश्किल झाले आहे. अनेकांना या भागातील जनतेला पावसाळ्यात डास, माशांशी सामना करावा लागत आहे. याचा परिणाम आरोग्य बिघडण्यावर होत आहे.
अनेक आंदोलने करूनही कचरा डेपो हटवत नाहीत- राजू गडकरी
आरोग्याला सातत्याने धोका पोहोचविणारा हा कचरा डेपोचा प्रकल्प तातडीने हलवावा, अशी मागणी कित्येक वर्षापासून आम्ही ग्रामस्थ करत आहोत. या डेपोतील रसायनमिश्रित पाण्याने गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचला असून वेगवेगळ्या आजारांनाही नागरिक बळी पडत आहेत. या प्रकल्पाविरोधात अनेक आंदोलने केली. एक पिढी संपत आली. मात्र कचरा डेपो काही हटवण्यात येत नाही.









