जानेवारीमध्ये निर्यातीत 9.7 टक्क्यांची घट
नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन बाजारपेठ मंदीच्या सावटामध्ये असल्याचे काहीसे वातावरण आहे. कारण यावर्षी जानेवारी महिन्यात निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.7 टक्के इतकी घट झाल्याची नोंद आहे. आयडीसीच्या मते, 2025 च्या पहिल्या महिन्यात एकूण 1.11 कोटी स्मार्टफोन निर्यात झाले. आयडीसीने म्हटले आहे की, मध्यम श्रेणी आणि प्रीमियम विभागात नवीन फोन लाँच करूनही, ग्राहकांची मागणी कमीच राहिली आहे. ज्यामुळे निर्यात कमी झाल्याचा अंदाज बांधला आहे. आयडीसीचे वरिष्ठ विश्लेषक आदित्य रामपाल म्हणाले, ‘या वर्षाच्या सुरुवातीला मध्यम श्रेणी आणि प्रीमियम विभागात अनेक फोन लाँच करूनही, निर्यात 9.7 टक्क्यांनी घटली आहे. कमकुवत ग्राहक मागणी दरम्यान अतिरिक्त उत्पादनामुळे फोन निर्यातीच्या बाबतीत बाजार जानेवारी 2024 च्या पातळीपर्यंत पोहोचू शकला नाही.’
अॅपलच अव्वल
2024 च्या चौथ्या तिमाहीत कमकुवत वाढीनंतर ही घसरण झाली आहे, ज्या दरम्यान 3.6 कोटी युनिट्सची शिपमेंट झाली होती. परंतु बाजारात मंदी असूनही, अॅपलने वाढ सुरूच ठेवली आहे आणि कंपनीने वर्षानुवर्षे 11.7 टक्के वाढ नोंदवली आहे, तर ओप्पोने 5.9 टक्के वाढ नोंदवली आहे. 11.4 टक्के हिस्सेदारी मिळवून अॅपल पुढे राहिली आहे.









