जगात आतापर्यंत जन्माला आलेल्या ज्ञात बुद्धीमान व्यक्तींमध्ये जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन हा सर्वाधिक बुद्धीमानांपैकी एक मानला जात आहे. आपण आईन्स्टाईनपेक्षा अधिक बुद्धीमान आहोत असा प्रतिपादनही कोणी करु शकणार नाही, अशी स्थिती आहे. तथापि, अमेरिकेतील क्रिस लँगन याने आपण आईन्स्टाईनपेक्षाही अधिक बुद्धिमान आहोत, असे प्रतिपादन केले आहे.
इतकेच नव्हे, तर जगातील सर्वात अवघड प्रश्नाचे उत्तर केवळ आपणच देऊ शकतो, असेही त्याचे म्हणणे आहे. तर जगातील सर्वात अवघड प्रश्न कोणता, हाच प्रश्न आता उभा राहिला आहे. अनेकांच्या मते, आयुष्य संपल्यानंतर, अर्थातच प्राण गेल्यानंतर पुढे काय होते, हा जगातील आतापर्यंतचा सर्वात अवघड प्रश्न आहे. या प्रश्नाचे अचूक आणि तर्काला पटण्यासारखे उत्तर आईन्स्टाईनसकट कोणत्याही बुद्धिमान व्यक्तीलाही देता आलेले नाही. या प्रश्नाचे उत्तर आपण शोधून काढले आहे, असे प्रतिपादन या लँगन नामक व्यक्तीचे आहे.
लँगन या व्यक्तीच्या बुद्ध्यांकाची चाचणी झालेली आहे. त्याचा बुद्ध्यांक किंवा ज्याला इंग्रजीत आयक्यू म्हणतात, तो 190 ते 210 असल्याचे सिद्ध झाले आहे. आईन्स्टाईनचा बुद्ध्यांक 160 इतका होता, अशी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे निदान बुद्ध्यांकाच्या निकषावर तरी लँगन हे भारी ठरतात, असे मानले जाते. मरणानंतर काय होते, या प्रश्नाचे त्यांनी दिलेले उत्तर असे की मरण हा अंत नाही. तर मरणानंतर माणूस एका नव्या जगात प्रवेश करतो. त्याचे केवळ ‘मिती’परिवर्तन होते. म्हणजे केवळ त्याची डायमेन्शन नवी होते. लँगन यांनी विश्वाचे ‘बोधात्मक तत्वज्ञान प्रारुप’ अर्थात कॉग्नेटिव्ह थिओरिटीक मॉडेल शोधून काढले आहे. हिंदू धर्माच्या तत्वज्ञानातही पुनर्जन्माची संकल्पना आहे. लँगन याचे तत्वज्ञान याच पुनर्जन्माच्या संकल्पनेच्या जवळ जाणार आहे, असे मानले जाते.









