दोन चारचाकी वाहनांच्या पार्किंगच्या जागेत लागणार 20 वाहने, ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात
विनोद सावंत कोल्हापूर
रेल्वे स्टेशन, गोकुळ हॉटेल परिसरात स्मार्ट पार्किंग होणार आहे. यामुळे कमी जागेत जास्त वाहने लावण्याची सोय होणार आहे. महापालिकेकडून यासाठी 4 कोटी 50 लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. सद्या निविदा प्रक्रिया सुरू असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर अशी धार्मिक स्थळे आहेत. तसेच पन्हाळा, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस अशी पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे रोज हजारो भाविकांसह पर्यटक कोल्हापुरात येतात. तसेच जिल्ह्यातून स्थानिक नागरिक शहरात खरेदीसाठी, नोकरीसाठी येतात. या सर्वांसमोर वाहने पार्कींग कुठे करायचा असा प्रश्न असतो. वाहनांच्या तुलनेत पापार्किंगची सुविधा तोकडी आहे. यामुळे पर्यटकांकडून रस्त्याच्याकडेला वाहने लावली जात असल्याचे अनेक वेळा आढळून येते. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. शनिवार आणि रविवारी विकेंडला शहराच्या मध्यवस्तीत वाहतुकीच्या कोंडीमुळे चालत जाणेही मुश्किल झालेले असते.
जिल्ह्यातील वाढती वाहनांची संख्या, पर्यटकांची वाहने यांचा विचार करून पार्किंगची ठिकाणे वाढविण्याची गरज आहे. महापालिकेकडून शहरातील पार्किंगचा ठेका केएमटी प्रशासनाकडे दिला आहे. प्रारंभी मनपाने केएमटीला 13 पार्किंगचे ठेके दिले होते. यापैकी 5 ठिकाणीच केवळ सद्या पे अँड पार्किंगची सोय आहे. उर्वरीत ठिकाणचे पार्किंग बंद झाले आहे. यामध्येही अंबाबाई मंदिर जवळ असल्याने बिंदू चौक येथील पार्किंगमध्ये सर्वाधिक वाहने लावली जातात. दसरा चौकातील मैदानावरही पार्किंग केले जाते. येथील पार्किंग फुल्ल झाल्यानंतर पर्यटक मिळेल तेथे वाहने लावून मंदिरात दर्शनासाठी जातात. यामुळेच खऱ्या अर्थाने वाहतुकीची कोंडी होत आहे. यावर पर्याय म्हणून महापालिकेकडून पार्किंगमध्ये वाहने जास्त बसतील यासाठी नियोजन सुरू आहे. यामध्ये रेल्वे स्टेशन, गोकुळ हॉटेल येथील केएमटीचा पे अँड पार्किंग आहे. या ठिकाणी सद्या 15 ते 20 चारचाकी वाहने लावण्याची क्षमता आहे. वास्तविक या ठिकाणी पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी स्मार्ट पार्किंग (मॅकनिकल पार्किंग) करण्याचे निर्णय घेतला आहे. यानुसार 4 कोटी 50 लाखांच्या निधीची तरतूद बजेटमध्येही केली आहे.
वाहने लाखांत पार्किंगची ठिकाणे सहा
कोल्हापूर शहरामध्ये 13 लाख हून अधिक घरगुती वाहनांची संख्या आहे. शहरात प्रतिव्यक्तीमागे एक वाहन असे समिकरणच आहे. यामुळे लाखांत वाहने असून पार्किंगची संख्या मात्र, हाताच्या बोटावर मोजण्याऐवजी म्हणजे केवळ सहा इतकी आहे. यामध्ये बिंदू चौक, खराडे कॉलेज, सीपीआर हॉस्पिटल, गोकुळ हॉटेल परिसर, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, दसरा चौक मैदान यांचा समावेश आहे. पार्किंगची सोयच नसेल तर वाहने लावायची कुठे असा प्रश्न निर्माण होतो. यामुळेच मनपाने पार्किंगच्या सोयीकडे जाणीवपूर्व लक्ष दिले आहे. सरस्वती टॉकीज येथे बहुमजली पार्किंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येथे 140 दुचाकी आणि 140 चार चाकी वाहन पार्किंगची सोय असणार आहे.
बिल्डींगमधील पार्कींग गायब
शहरातील अनेक बिल्डींगचे पार्किंग गायब झाले आहे. काही व्यावसायिकांनी पार्किंगच्या जागी गाळे बांधले आहेत. त्याच्याकडे येणाऱ्यांचे पार्किंग रस्त्यावरच होत आहे. अशा मिळकतींवर मनपाने काही दिवसांपूर्वी कारवाईची मोहीम राबवली होती. ही मोहीम नेमकी का थांबली हा संशोधनाचा विषय आहे.
स्मार्ट पार्किंगच्या कामाचा ऑगस्टमध्ये मुहूर्त
गोकुळ हॉटेल येथील स्मार्ट पार्किंगसाठी 15 दिवसांत कन्स्लटंटकडून टेंडर डाक्यूमेंट करून निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर ठेकेदारांची नेमणूक होईल. ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पार्किंगची क्षमता भविष्यात वाढविता येईल अशा दृष्टीने येथे स्मार्ट पार्किंग नियोजित आहे. सद्या दोन गाड्यांच्या पार्किंगच्या जागेत 20 गाड्या पार्कींग करण्याची सुविधा येथे असणार आहे.
गोकुळ हॉटेल येथे सिव्हील, इलेक्ट्रीक मॅकनिकल अशा तीन टप्प्यावर पार्किंग असणार आहे. स्मार्ट पार्किंगसाठी कन्स्लटंट नेमण्यात आला असून त्यांनी इस्टीमेंट आणि टेंडर डाक्यूमेंट तयार केल्यानंतर टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे. 4 कोटी 50 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मुलभूत सोयी सुविधेमधून यासाठी निधी मंजूर आहे. अरूणकुमार गवळी, प्रकल्प अधिकारी, महापालिका
स्मार्ट पार्किंगसाठी मंजूर निधी -4 कोटी 50 लाख
कामाची मुदत -2 वर्ष
अपेक्षित वाहनांची पार्किंगची संख्या-100









