कोल्हापूर :
कोल्हापूर शहर आणि उपनगरासाठी रोज तब्बल 180 ते 190 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा उपसा होतो. बिलिंग मात्र फक्त 60 ते 70 दशलक्ष पाण्याचेच होते. यावर उपाय म्हणून पहिल्या टप्प्यात औद्योगिक आणि व्यापारी आस्थापणांना स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. स्मार्टमीटरची पाणी व्यवस्थापन सुधारण्यास, बिलिंग अचूक करण्यास आणि पाण्याचा अपव्यय कमी करण्यास मदत होणार आहे.
पाणी पुरवठ्याकडील नोंदीनुसार शहरात एक लाख चार हजार 862 नळजोडण्या आहेत. महापालिकेच्या 50 उद्यानांना पाणीपुरवठा, मैदानांसह मनपाच्या आस्थापनांसाठी वारेमाप पाण्याचा वापर, 20 ते 25 पाणी गळती. 35 टक्के नळ जोडण्यासाठी स्थिर आकाराने पाणीपुरवठा, व्यावसायिक आस्थापनाकडून घरगुती दराने पाणी पुरवठा, विनामिटर नळ जोडण्या आदी कारणांने तब्बल 100 एमएलडी पाण्याचा हिशोबच महापालिकेकडे नाही. या पाण्याचा हिशोब घेण्यासाठी महापालिका यंत्रणा आता ठोस उपाययोजना करण्याच्या विचारात आहे. यासाठी अर्थसंकल्पात 25 लाखांची तरतूद केली असून शहरात यंदाच्या वर्षी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार पाणी पुरवठ्याचे बिलिंग साधारण 60 कोटी असून सरासरी 50-55 कोटी रुपये जमा होतात. स्मार्ट मीटरमुळे यामध्ये किमान दहा कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
- खाबुगिरीला बसणार आळा
पाणी मिटर तपासणारी यंत्रणाही खाबुगिरीत अखंड बुडालेली आहे. यातून फुकटचे पाणी देणे, व्यावसायिक आस्थापनांना घरगुती पाणी पुरवठा, बांधकामांवर पाणी वापराकडे दुर्लक्ष, पाणी मिटरमध्ये फेरफाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आदी वरकमाईच्या कामात येथील यंत्रणा अडकली आहे. स्मार्टमीटरमुळे या सर्वप्रकाराला आळा बसणार आहे.
- पाणी बिलिंगसाठी स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये
1. रिअल–टाइम डेटा संकलन : स्मार्ट मीटर पाण्याच्या वापराचा डेटा रिअल–टाइममध्ये मोजमाप आणि रेकॉर्ड होईल. यामुळे मॅन्युअल रीडिंगची गरज नाही.
2 वायरलेस कम्युनिकेशन : वायरलेस तंत्रज्ञानाद्वारे पाणी वापराचा डेटा केंद्रीय सर्व्हरवर पाठवतात. यामुळे डेटा जलद आणि स्वयंचलितपणे संकलित होतो.
3 अचूक बिलिंग : मीटर प्रत्यक्ष वापरावर आधारित अचूक मोजणी करतात. पाण्याशिवाय हवेच्या दाबाने मीटर फिरत नाही, अंदाजे बिलिंग होणार नाही.
4 लीक डिटेक्शन : नळाला सतत गळती होत असल्यास तशी माहिती स्मार्ट मीटर कळवते. पाण्याचा अपव्यय टाळतो.
5 ग्राहक पोर्टल आणि मोबाइल अॅप : ग्राहकांना त्यांच्या पाणी वापराचा डेटा वेब पोर्टल किंवा मोबाइल अॅपद्वारे पाहता येतो. पाणी आणि बिलाची बचत करु शकतात.
6 स्वयंचलित बिल जनरेशन : मीटरद्वारे संकलित डेटावर आधारित बिल आपोआप तयार होतात आणि ग्राहकांना पाठवले जातात, ज्यामुळे मॅन्युअल बिलिंग प्रक्रियेतील त्रृटी राहत नाहीत.
7 रिमोट मॉनिटरिंग आणि कंट्रोल : बिलींग न भरल्यास रिमोट मॉनिटरिंग आणि काही प्रकरणांमध्ये पाणी पुरवठा बंद करण्याची सुविधा मिळते.
8 डेटा विश्लेषण : संकलित डेटाचे विश्लेषण करून पाणी वापराचे नमुने समजून घेता येतात, ज्याचा उपयोग पाणी संरक्षण मोहिमांसाठी आणि पुरवठा ऑप्टिमायझेशनसाठी होतो.
9 सुरक्षितता आणि गोपनीयता : स्मार्ट मीटरद्वारे पाठवला जाणारा डेटा एक्रिप्टेड असतो, ज्यामुळे ग्राहकांची माहिती सुरक्षित राहते.
- फायदे:
10 पाणी संरक्षण : रिअल–टाइम डेटामुळे ग्राहकांना त्यांच्या वापराची जाणीव होते, ज्यामुळे पाणी वाचवण्याचे प्रयत्न वाढतात.
11 खर्चात बचत : गळती लवकर ओळखल्याने दुरुस्तीचा खर्च आणि पाण्याचा अपव्यय कमी होतो.
12 सुधारित व्यवस्थापन : पाणी पुरवठादारांना अचूक डेटामुळे संसाधनांचे नियोजन आणि वितरण सुधारता येते.








