मुंबई : महावितरणने आवश्यकतेनुसार सुरूवातीला शहरी भागातील ग्राहकांकडे स्मार्ट मिटर बसवावेत आणि या कामात यशस्वी झाल्यानंतरच ग्रामिण भागातही स्मार्ट मिटर बसविण्यात यावेत. याशिवाय स्मार्ट मीटर हे चांगल्या कंपनीचे आणि उच्च दर्जाचे असावेत अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण व महानिर्मितीचे मुख्यालय असलेल्या मुंबई येथील प्रकाशगड येथे आज झालेल्या बैठकीत केल्या आहेत.
महानिर्मितीचा आढावा घेतांना जुने सबक्रिटिकल संच टप्प्याटप्प्याने बंद करून तिथे नव्या अत्याधुनिक व पर्यावरणपूरक सुपर क्रिटिकल संचाची उभारणी गरजेनुसार व गतिमानतेने करण्याच्या सूचना श्री देवेंद्र फ़डणवीस त्यांनी केल्यात. चंद्रपूर येथील इराई जलाशयात प्रस्तावित तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या धर्तीवर मराठवाड्यातील जायकवाडी धरणातही तसा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची चाचपणी करण्यात यावी. खात्रीशीर वीजनिर्मितीसाठी व विशेषतः सर्वोच्च मागणीच्या काळात विजेची पूर्तता करण्यासाठी पंप स्टोअरेज जलप्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन त्यावर कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. वीज केंद्रांच्या कामगिरीत आणखी सुधारणा करून वीज केंद्रातील पर्यावरण व सुरक्षितता याबाबत दक्ष राहून पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. सर्व विभागातील प्रलंबित सौर प्रकल्पांना गती देणे, कोळसा पुरवठा दर्जेदार होईल यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि कालपरत्वे जुने बंद केलेल्या वीज संचांच्या जागेचा विधायक उपयोग करून त्यायोगे मालमत्ता चलनीकरणाच्या प्रक्रियेतून महानिर्मितीला वाढीव उत्पन्नाचा स्रोत शोधण्यासाठी प्रयत्न करण्यावर देखील त्यांनी यावेळी विशेष भर दिला.
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.