कामे ‘सुपरफास्ट’ तरीही संपता संपेनात
पणजी : स्मार्ट सिटीच्या नावाखाली राजधानीत सध्या चाललेली अनागोंदी,कंत्राटदारांचा बेजबाबदारपणा आणि संबंधित सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत असून जागोजागी खोदकामे, धुळीचे साम्राज्य, अडविलेले रस्ते, वाहतूक कोंडी, प्रदूषण यामुळे कुठे गेल्यास कुठे पोहोचेल हेच समजत नाही, अशा सावळ्या गोंधळात लोक सापडले आहेत. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे लोकांच्या या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा कोणत्याही ठिकाणी कंत्राटदारांची माणसे किंवा वाहतूक पोलीसही दिसत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया पणजीचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून राजधानीत स्मार्ट सिटीने अशी लोकांची गैरसोय करून ठेवली आहे. अमर्यादित आणि अनियंत्रित अशी कामे एकाचवेळी हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांच्या हालांना पारावार राहिलेला नाही. ही कामे कधी संपतील हे स्वत: सरकारच सांगू शकत नाही हेच सध्याचे सत्य आहे. त्यामुळे केवळ तारखा देऊन वेळ मारून नेण्याचे काम स्मार्ट सिटीचे अधिकारी करत आहेत. गतवर्षी मे महिन्याच्या शेवटपर्यंत कामे पूर्ण होतील असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात देण्यात आले होते. त्यामुळे लोकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला होता. परंतु स्वत: स्मार्ट सिटी कंपनीच वचनाला जागली नाही व 2024 चा मे महिना संपून नऊ महिने सरले तरी ही कामे संपेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या राजधानीत चाललेली कामे पाहता गतवर्षी संपूर्ण शहर खोदून नक्की काय केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या तर शहरातील तब्बल पाच मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य मार्गांवर प्रचंड ताण पडत असून वारंवार होणाऱ्या कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. पार्किंगसाठी जागा मिळणे तर अशक्यप्राय गोष्ट बनली असून मिळेल तेथे अस्ताव्यस्त पार्किंगमुळे या कोंडीत अधिकच भर पडली आहे. अशावेळी एवढ्या सुपरफास्ट गतीने स्मार्ट सिटीची कामे करणे खरोखरच आवश्यक होते का? असा सवालही लोक आणि खास करून राजधानीतील व्यापारीवर्गाकडून विचारण्यात येत आहे.









