शक्ती योजनेंतर्गत वितरण, दोन महिन्यात मिळणार कार्ड : विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिलांना बसणार आळा
बेळगाव : पाच गॅरंटी योजनांपैकी असलेल्या शक्ती योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी महिला लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड वितरण होणार आहे. राज्य सरकारने यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील दोन महिन्यांत लाभार्थी महिलांना स्मार्ट कार्डचे वितरण केले जाणार आहे. यामुळे महिलांना आधारकार्ड घेऊन प्रवास करण्याची गरज भासणार नाही. मागील दीड वर्षांपासून शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू आहे. मात्र महिलांना प्रवासासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र स्मार्ट कार्ड वितरणानंतर महिलांना स्वत:जवळ आधारकार्ड ठेवण्याची गरज नाही. शिवाय विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिलांनाही आळा बसणार आहे.
महिला-वाहकामध्ये वादावादी
बेळगाव विभागातील सात आगारांमध्ये दररोज लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सद्यस्थितीत महिलांना आधारकार्डच्या आधारावर मोफत प्रवास दिला जात आहे. याठिकाणी आता स्मार्ट कार्ड वितरीत केले जाणार आहेत. काहीवेळा बसमध्ये आधारकार्ड आणि इतर कारणावरून महिला प्रवासी आणि बस वाहकांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडू लागले आहेत. तर काही महिला तिकीट न काढताच प्रवास करू लागल्या आहेत. या सर्व गैरप्रकारांना आळा बसणार आहे. शक्ती योजनेंतर्गत राज्यांतर्गत बस प्रवास सुसाट सुरू आहे. विशेषत: दैनंदिन प्रवास करणाऱ्या कामगार महिलांनी संधीचा पुरेपूर फायदा उठविला आहे. स्मार्ट कार्ड वितरणासाठी लवकरच निविदा मागविल्या जाणार आहेत. शिवाय ग्रामवन, बेळगाववनमध्ये अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सेवासिंधू पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत प्रवास करणाऱ्या महिलांच्या हातात आधारकार्डाऐवजी स्मार्ट कार्ड दिसणार आहेत.









