पुणे / प्रतिनिधी :
कारागृहातील कैद्यांना नातलगांसोबत संवाद साधण्यासाठी कॉईनबॉक्सऐवजी स्मार्टकार्ड फोनद्वारे संवाद साधता येणार असून, प्रायोगिक तत्त्वावरील या सेवेचा येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रारंभ करण्यात आला आहे. योजनेची अंमलबजावणी चांगल्या रीतीने झाल्यास संपूर्ण राज्यात स्मार्टकार्ड फोन उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित सुविधेचे उद्घाटन गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालींदर सुपेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कैद्यांना नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉइन बॉक्स सुविधा उपलब्ध आहे. परंतु, कॉईन बॉक्स सद्यस्थितीत बाजारात उपलब्ध होत नाहीत. कॉईन बॉक्स नादुरूस्त झाल्यास दुरूस्ती करून मिळत नाही. त्यामुळे बहुतांशी सुविधा बंद झाल्यामुळे कैद्यांच्या नातलगांसोबतच्या संवादाला आडकाठी निर्माण झाली होती. त्याशिवाय अति सुरक्षा विभाग, सुरक्षा यार्ड व विभक्त कोठडय़ांमधील बंद्यांनाही नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉईन बॉक्स असलेल्या ठिकाणी न्यावे लागत होते. त्यामुळे कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक ठरण्याची शक्यता होती. त्यापार्श्वभूमीवर काही कारागृह अधिक्षकांनी कॉईन बॉक्सऐवजी साधे मोबाइल फोन वापर करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरू करण्याची शिफारस शासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाची यशस्विता तपासल्यानंतर तो राज्यभर लागू करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.








