सेवा सिंधू पोर्टलवर सुविधा उपलब्ध : जुन्या बसपासची मुदत 10 जुलैपर्यंत वाढविली
बेळगाव : विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा, यासाठी स्मार्टकार्ड बसपासचे वितरण करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे स्मार्टकार्ड वाटप केले जात आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. सेवा सिंधू पोर्टलच्या माध्यमातून स्मार्टकार्ड वितरणाचे काम सुरू आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना स्मार्टकार्डचे वितरण होत आहे. विद्यार्थ्यांना हे कार्ड पाकिटात ठेवणे सोयीस्कर होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम सेवा सिंधू पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी 30 जूनपर्यंत जुन्या बसपासची मुदत वाढविण्यात आली होती. मात्र, या कालावधीत बहुतांश विद्यार्थ्यांनी बसपास काढले नाहीत. त्यामुळे परिवहनने जुन्या बसपासची मुदत पुन्हा 10 जुलैपर्यंत वाढविली आहे. आता या कालावधीत विद्यार्थ्यांना बसपास काढणे आवश्यक आहे. अन्यथा तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. सध्या विद्यार्थी ओळखपत्र, प्रवेश शुल्क पावती दाखवून विनामूल्य प्रवास करू शकतात. सर्व बसमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. परिवहनने ऑनलाईन स्मार्टकार्डसाठी http://sevssindhuswevice.karnataka.gov.in ही वेबसाईट उपलब्ध केली आहे.
शक्ती योजनेंतर्गत विद्यार्थिनींना मोफत बसपास
शक्ती योजनेंतर्गत महिला आणि विद्यार्थिनींना मोफत बसपासची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थिनी ओळखपत्र दाखवून विनामूल्य प्रवास करू शकतात. मात्र, आंतरराज्य प्रवास करणाऱ्या मुलींसाठी बसपास आवश्यक आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत बसप्रवासाची मुभा मिळणार नाही.









