एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत 418 नवीन उद्योग, बेरोजगारांच्या हाताला काम
प्रतिनिधी/ बेळगाव
शासनाने एक जिल्हा पीक उत्पादन योजना लागू केली आहे. याअंतर्गत गावोगावी लघुउद्योग वाढू लागले आहेत. 2020 ते 2023 या कालावधीत तब्बल 2450 हून अधिक लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर इंडिया’ ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत केमिकल फ्री गुळाची निवड झाली होती. मात्र या उद्योगासाठी शेतकरी निरुत्साही असल्याचे दिसत आहेत. या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी लघुउद्योग स्थापन करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लघुउद्योग सुरू करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरी महिला पुढे येऊ लागल्या आहेत. परिणामी एका वर्षात लहान उद्योगांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.
रसायनमुक्त गुळाच्या उत्पादनात चार वर्षांत 80 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे सेंद्रिय गूळ उत्पादनाला फटका बसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजना राबविली आहे. ज्या भागात उसाचे उत्पादन आहे, त्याठिकाणी रसायनमुक्त गूळ निर्मितीसाठी चालना दिली जात आहे.
जिल्ह्यात निर्माण झालेले लघुउद्योग
बेकरी-30, काजू-18, मिरची पावडर-33, तेल व्यवसाय-31, दूध व्यवसाय- 23, भाजीभाकरी व्यवसाय-106, तयार खाद्य-9, चिंच व्यवसाय-2 तूरडाळ-3, हळदपूड-11, शेवया व्यवसाय-5, गूळ व्यवसाय-26, चिप्स उद्योग-26, जैविक उद्योग-69, पशु आहार-6, गिरणी व्यवसाय-2, लोणची व्यवसाय-2 निर्माण झाले आहेत. एकूण जिल्ह्यात 418 नवीन लघुउद्योगांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध झाले आहे.
लघुउद्योगासाठी मंजूर अनुदान
तपशील आकडा
अर्जदार 845
अर्ज मंजूर 418
कर्ज मंजूर 33.22 कोटी रु.
अनुदान मंजूर 6.18 कोटी रु.
बेळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर
-शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)
एक जिल्हा एक उत्पादन योजनेंतर्गत लघुउद्योग विस्तारू लागले आहेत. बेळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. लघुउद्योग उभारणीसाठी बँकांकडून 33.22 कोटी रुपये मंजूर केले आहेत. गिरणी, बेकरी, काजू, मिरची पावडर लघू व्यावसायिकांची संख्या अधिक आहे.