बँक ठेवींमध्ये दीड पटीने वाढ, अधिक व्याजामुळे अल्पबचत योजनेला प्राधान्य
नवी दिल्ली ः बँक ठेवींपेक्षा पोस्ट ऑफिसच्या छोटय़ा बचत योजना अधिक लोकप्रिय होत आहेत. गेल्या पाच वर्षांत अल्पबचत ठेवी दुपटीने वाढल्या आहेत, तर बँक ठेवींमध्ये दीडपट वाढ झाली आहे. चढे व्याजदर हे त्याचे प्रमुख कारण होते.
बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार, अल्पबचत ठेवी आणि बँक ठेवींचे प्रमाण आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 4.4 टक्के होते, जे 2021-22 मध्ये 5.8 टक्क्यांपर्यंत वाढले. दरम्यान, एकूण ठेवींमध्ये लहान बचत योजनांचा हिस्सा कधीच कमी झालेला नाही. बँकेच्या ठेवी वाढवण्यासाठी मोहीम राबवत असताना ही स्थिती राहिली आहे.
अल्पबचत योजनांचा वाटा
फेब्रुवारी 2022 पर्यंत बँकांमध्ये एकूण ठेवी 170.2 लाख कोटी होत्या. या तुलनेत अल्पबचत ठेवी 9.9 लाख कोटी होत्या. गेल्या पाच वर्षांत बँक ठेवींमध्ये 55.4 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तर लहान बचत ठेवींमध्ये 4.6 लाख कोटींची वाढ झाल्याची माहिती आहे. दरम्यानच्या काळात एकूण ठेवींमध्ये लहान बचत योजनांचा वाटा वाढला आहे.
छोटय़ा बचत योजना लोकप्रिय
2016-17 पर्यंत बँका आणि पोस्ट ऑफिसच्या छोटय़ा बचत योजनांचा व्याजदर एकसमान 4 टक्के होता. 2021-22 मध्ये, बँकांचे सरासरी ठेव दर 2.7 टक्के होते, तर पोस्ट ऑफिसचे दर 4 टक्के होते. 2016-17 मध्ये, बँका आणि पोस्ट ऑफिस 1 वर्षाच्या बचत योजनांसाठी 6.8 टक्के दर देत होते.









