लहान उद्योजकांनी चेंबर ऑफ कॉमर्ससमोर मांडल्या समस्या
बेळगाव : बेळगावमधील औद्योगिक वसाहतींमध्ये सध्या मंदीचे सावट आहे. अनेक लहान कारखान्यांना काम नसल्यामुळे कामगार कपात करावी लागत आहे. त्यामुळे भविष्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असून लहान उद्योजक लयास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातून मार्ग काढावा, अशी मागणी बेळगावमधील लहान उद्योजकांच्यावतीने सोमवारी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहात उद्योजकांनी भेट घेऊन लहान उद्योजकांसमोरच्या अडचणी पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजीव कट्टीशेट्टी होते.
बेळगाव शहरातील उद्योग क्षेत्रात दररोज मोठी आर्थिक उलाढाल होत असते. बेळगावसह परिसरातील अनेक बेरोजगार तरुणांना यामुळे रोजगार मिळाला आहे. परंतु सध्याच्या मंदीमुळे लहान उद्योग अडचणीत सापडले आहेत. कर्जाचे हप्ते भरणेही अशक्य होत आहे. अशा परिस्थितीत लहान उद्योगांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढण्याची मागणी करण्यात आली. चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या समस्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपाध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी, सेक्रेटरी राजेंद्र मुतगेकर, खजिनदार मनोजकुमार मत्तीकोप्प, आनंद देसाई तसेच उद्योजकांमध्ये सुनील तिरोडकर, मनोहर सुतार, गजानन नावगेकर, रवी कित्तूर, यादव यासह इतर उद्योजक उपस्थित होते.









