वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अत्यंत श्रीमंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्याला आता परदेश दौऱ्यावर असताना दररोज 1000 डॉलर्सचा भत्ता मिळेल आणि विमानातून प्रथम श्रेणीतून प्रवास करण्याची सुविधाही मिळेल. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली असून रविवारी झालेल्या मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आलेला असला, तरी ही वाढ गेल्या ऑक्टोबरपासून लागू झालेली आहे.
बीसीसीआयकडून दैनंदिन भत्त्यात सात वर्षांहून अधिक काळानंतर वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना परदेश दौऱ्यांवर असताना प्रतिदिन 750 डॉलर्स मिळायचे. नव्या सुधारणांनुसार, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सह-सचिव या पदाधिकाऱ्यांना भारतातील बैठकांच्या वेळी दररोज 40,000 रु. भत्त्यापोटी मिळतील आणि बिझनेस क्लासमधून विमान प्रवासाची सुविधा मिळेल. ‘कामानिमित्त झालेल्या प्रवासा’च्या बाबतीत त्यांना दिवसाला 30,000 रु. दिले जातील. ते देशांतर्गत आणि परदेशातील दौऱ्यांवेळी ‘सूट रूम’ देखील आरक्षित करू शकतात. आयपीएल अध्यक्षांचे भत्तेही पदाधिकाऱ्यांच्या श्रेणीत आणले गेले आहेत.
भारतीय क्रिकेटपटू संघटनेच्या दोन प्रतिनिधींसह बीसीसीआयच्या सर्वोच्च मंडळाच्या सदस्यांना त्यांच्या त्रैमासिक बैठकीसाठी दररोज 40,000 रु. आणि परदेश दौऱ्यांवेळी 500 डॉलर्स मिळतील. मात्र, सहसा मंडळाचे पदाधिकारीच कामानिमित्त परदेश दौऱ्यावर असतात. मंडळाने आपल्या राज्य शाखांच्या सदस्यांसाठीचे भत्ते देखील वाढवले आहेत. त्यांना आता देशांतर्गत दौऱ्यावेळी दररोज 30,000 रुपये आणि परदेशी दौऱ्यावेळी 400 डॉलर्स मिळतील.
पुरुष आणि महिला राष्ट्रीय संघांचे मुख्य प्रशिक्षक निवडणाऱ्या क्रिकेट सल्लागार समितीच्या तीन सदस्यांना बैठकीसाठी प्रत्येकी 3.5 लाख रु. दिले जातील. त्यांच्या बाबतीत परदेश दौऱ्याची शक्यता नाही. परंतु परदेश दौरा करावा लागला, तर त्यांच्यापैकी प्रत्येकाला दररोज 400 डॉलर्स मिळतील अशी तरतूद करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची पदे ही मानद् आहेत. त्यांच्या चांगल्या पगाराच्या सीईओसारख्या कर्मचाऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी 650 डॉलर्सचा आणि भारतातील दौऱ्यासाठी दैनंदिन 15,000 रुपयांचा भत्ता मिळेल.









