नदी वाहताना आपल्यासोबत एका संपूर्ण संस्कृतीच्या पाऊलखुणा घेऊनच पुढे जात असते. तिच्या उगमापासून मुखापर्यंत असलेली लोकवस्ती, तिच्या पाण्यावर उभी राहिलेली हिरवीगार शेतं, जमिनीच्या पोटात तिने झिरपवलेल्या मायेवर उंच उंच जाणारी झाडं आणि पाणी हे जीवन आहे हे पटवून देणारं तिचं अस्तित्त्व, यामुळे नदीशी आपलं आदिम सख्य असतं. ऊजणं, सृजन म्हणजेच काहीतरी नवीन जन्माला येणं हे तिच्यामुळे घडतं. म्हणून ती नदीमाय होते. कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात नदी ही आपली कुटुंबातील सदस्य असते. अखंड वाहणे हा तिचा गुणधर्म असल्याने तिच्यात नादमयता असते. आणि गाणं हेही पाण्यासारखंच वाहतं असल्यामुळे परस्परांचं अद्वैत हेही ओघानेच आलं. नदी आणि तिच्याशी संबंधित गाणी आपल्याला प्रत्येक भाषेत मिळतीलच मिळतील. उत्तर भारतीयांना गंगा, यमुनेचं कौतुक तर पंजाबी, काश्मिरिंना आपल्या देशाला विरह सोसायला लावणाऱ्या सिंधू नदीचं कौतुक. तो सल ती लोकं
पंछी नदियाँ पवन के झोंके
कोई सरहद ना इन्हें रोके
सरहदें इन्सानों के लिये हैं
देखो तुमने और मैंने
क्मया पाया इन्सां हो के
अशासारख्या गीतातून व्यक्त करतात. खरं तर हा पिक्चर ‘रेफ्युजी’ फारसा चालला नव्हता. पण ही गाणी अतिशय सुंदर आहेत. साऱ्या भारतवर्षात अत्यंत पूज्य, पवित्र मानल्या गेलेल्या गंगामैयाचं तर काय वर्णन करावं? आणि शास्त्रीय संगीताला यमुनेची इतकी भूल का बरं पडावी? अगदी ‘जमुना किनारे मोरा गाँव’, पासून ते ‘जमुना के तीर’ या भैरवीपर्यंतची ही रेंज अफाट आहे. नर्मदा ही मध्यभारत, उत्तर महाराष्ट्र सीमारेषा आणि गुजरात या तिन्हीची जीवनदायिनी! केवळ दर्शनाने पापहरण करणारी. तिच्या काठावर एक समृद्ध अशी गानसंस्कृतीही फोफावली असल्यास नवल नाही. यमुनेसारखी ती सारखी सारखी चिजांमधून डोकावत नाही. तिचा आबच निराळा. ग्वाल्हेर घराणं आपल्या पंखाखाली बहरलं याचा जणु यथार्थ अभिनिवेश असणारी ती तशी गंभीर पण तोडी किंवा मालकंसासारखी अथांग! महाराष्ट्राला मात्र पूर्वापार अपूर्वाई आहे ती कृष्णा माणगंगा, कोयना, चंद्रभागा आणि गोदावरीची! त्याचं मोठ्ठ्यात मोठ्ठं उदाहरण हवंय?
रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय महाराष्ट्र माझा..
साऱ्या महाराष्ट्राचा अभिमान असलेलं हे महाराष्ट्रगीत पहिल्याच कडव्यात महाराष्ट्रातील साऱ्या नद्यांचं गुणगान गातं. कित्येक शहरांत अगदी प्रवेश करतानाच नदी ओलांडावी लागते. आणि म्हणून
आळविते तुला ज्योतिर्लिंगा
गीत गाते तुझे पंचगंगा
असं म्हणत कोल्हापूरच्या वेशीवर पंचगंगा सामोरी येते. आणि अखंड महाराष्ट्राला जिच्याविषयी अतीव आदर, प्रेम आहे ती साऱ्याची कृष्णामाई तिथूनच पुढे तिला भेटायला येते. तिचा पंचगंगेशी जिथे संगम होतो ते क्षेत्रही परमपावन गुऊमहाराजांचे स्थान अर्थात नृसिंहवाडी.
दत्त दत्त नामाचा महिमा
भवसिंधु हा पार कराया अवतरली कऊणा
या अतिशय लोकप्रिय गीतात प्राधान्याने उल्लेख होतो तो
कृष्णामाई वाहे झुळझुळ
दत्तनाम हे घेत मंजुळ
नरसोबाच्या वाडीमधुनी
कऊया गुऊनमना
असा. नरसोबाची वाडी आणि कृष्णामाई हे एक पवित्र अद्वैत आहे. तिला तिथे लोकमाता म्हणून पूजनीय मानलं जातं. अगदी तिचे प्रेमसोहळे केले जातात. गेली कित्येक वर्षे तिच्या काठावर अख्खा आठवडा भरगच्च साजरा होणारा कृष्णावेणी महोत्सव हे त्याचंच जितंजागतं सुरेल उदाहरण आहे. त्यामध्ये गायन, वादन आणि नामसंकीर्तन सतत होत असतं. त्या अर्थाने कृष्णामाई स्वरसरिताच होऊन जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगण अशा तीन चार राज्यांतून वाहत जाणारी ही कृष्णा शेवटी राजमहेंद्री जवळून बंगालच्या उपसागरात विलीन होते. तिच्या नावाचं एक रेल्वे स्टेशनही आहे. तिच्या पुलावरून गाडी जेव्हा जाऊ लागते तेव्हा तिच्या प्रवाहाकडे पाहताना
कृष्णेच्या तीरावर औदुंबर वसले
गुऊरायाचे दर्शन घेण्या भक्तगण आज जमले.
या गाण्याच्या ओळी आपोआपच मनात उमलू लागतात आणि लांबूनच गुऊमहाराजांना हात जोडले जातात. कृष्णेच्या तीरावर बरीच तीर्थस्थळं आहेत. म्हणून तर दत्तमहाराजांचा जयजयकार करणाऱ्या एका गीतात जुन्या पिढीतील अतिशय लोकप्रिय भक्तिसंगीत गायक आर एन पराडकर यांच्या अतिशय आर्जवी सुरातलं
कृष्णा भीमा चरण क्षाळिती
शीतल वायू ताप वारीती
नारद तुंबर गाती रमती ऋषीमुनी गुऊमाऊली
जय जय दत्तराज माऊली
जय जय गुऊराज माउली
हे गीत ऐकणाऱ्याला डोलायला लावतं. त्याकाळी कृष्णेचं पाणीही निर्मळ होतं आणि त्यावेळचे कलाकारही तेच निर्मळ मन घेऊन गायचे. म्हणून की काय त्यांचं गाणं त्याच पाण्याप्रमाणे निर्मळ आणि वाहतं असे. घाटमाथ्यावरच्या सांगली, सातारा, सांगलीसारख्या जिह्यांतील कित्येक गावांमधून वाहते. तिथल्या सासुरवासिनी माहेरवाशिणी तिच्या अंगाखांद्यावर खेळून मोठ्या होतात आणि मग सासरची सगळी सुखदु:खही तिलाच सांगतात. म्हणून मग तिची एखादी लेक
कृष्णा मिळाली कोयनेला
तसंच माझं माहेर बाई येऊन मिळालं सासरला
असं आपल्या सासरमाहेरचं सौख्यकवतिक अभिमानाने सांगत येते. कृष्णेची सगळी रूपं डोळ्यात साठवावी तितकी कमीच आहेत. पण तीरावरील सुखदु:खांचा कोणताच हिशोब मनात न ठेवता संथपणे वाहत राहणारी कृष्णामाई सगळ्यात जवळची वाटते.
सतत वाहते उदंड पाणी,कुणी न वळवुन नेई रानी
आळशासही व्हावी कैसी गंगा फलदायी?
या ओळींचा खरा अर्थ कळतो तो ते गाणं ऐकून. सिंचन आणि पाणी व्यवस्थापन या विषयावर इतका सुरस सुरेख आणि मनोहारी चित्रपट बनू शकतो हे ‘संथ वाहते कृष्णामाई’ याच नावाच्या सिनेमानं अगदी सिद्ध केले आहे. चांगल्या गोष्टींसाठी जे शहाणे लोक अक्षरश: संन्यास घेऊन धडपड करतात ते व्यावहारिक जगात तसेही वेडेच ठरत असतात. पण कृष्णामाईला त्याचं काय हो? ओंजळ पसरणाऱ्या प्रत्येकाची तहान भागवताना ती भेदभाव करत नाही आणि वेड्या माणसाकडे पाहून वाहणं विसरत नाही. कारण
तीरावरल्या सुखदु:खांची जाणिव तिजला नाही
संथ वाहते कृष्णामाई..
– अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु








