वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टी-20 च्या प्रसाराने कसोटी क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात आणले आहेच, परंतु कसोटी क्रिकेटमधील खेळण्याचा अत्यंत कमी वेग हा देखील त्रासदायक ठरत आहे, असे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू इयान चॅपेल यांचे मत आहे. ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’च्या एका स्तंभात चॅपेल यांनी फलंदाज खेळपट्टीवर बराच वेळ वाया घालवत असल्याबद्दल त्यांना दोष दिला आहे.
कसोटी क्रिकेटमधील खेळाचा वेग अत्यंत वाईट आहे. तो मंद होत चालला आहे आणि यामध्ये सुधारणा करण्यासाठी काहीही केले जात नाही. एकीकडे बेन स्टोक्स खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेटचा मनोरंजनाचा भाग सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु प्रशासकांच्या पुढाकाराच्या अभावामुळे तो कमी पडत आहे, असे त्यांनी त्यात नमूद केले आहे.
षटकांच्या दरम्यान फलंदाजांना खेळपट्टीवर मध्ये येऊन चर्चा करण्यास अनुमती का दिली जाते आणि त्यांना दंड का ठोठावला जात नाही ? जेव्हा गोलंदाज चेंडू टाकण्यास तयार असतो तेव्हा शिष्टाचारानुसार फलंदाजाने क्रीजवर सज्ज राहणे आवश्यक असते हे फलंदाजांना का कळवले जात नाही ? उष्णतेची तीव्रता वगळता नियमित ‘ब्रेक’च्या पलीकडे काही वेळा पेये का द्यायची ? हातमोजे बदलण्याचे प्रकार इतक्या वेळा का होतात ? अर्थातच ही गरज नव्हे, तर नक्कीच अंधश्रद्धा आहे. क्षेत्ररक्षकाचे पाय किंवा हात कुठे आहेत हे पाहणाऱ्या निरर्थक रिप्लेला परवानगी देण्यापेक्षा केवळ दोरीला आदळलेला चेंडू लक्षात घेऊन चौकार का दिले जात नाहीत ?, असे प्रश्न इयान चॅपेल यांनी उठविले आहेत.
‘डीआरएस’चाही खेळाचा वेग कमी होण्यास हातभार लागला आहे, असे चॅपेल यांना वाटते. खेळाडूंनी पंचांशी कसा वाद घालू नये हे प्रशासकांनी ऐकलेले आहे का ? मग तेच प्रशासक खेळाडूंना निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची मुभा देऊन पंचाशी वाद घालण्यास का प्रोत्साहन देतात ? खेळाच्या पुनरावलोकनाची संख्या हाताबाहेर जात आहे आणि रिप्ले खूप वेळ घेत आहेत. खेळाडूंना अपिल करत असताना पंचांच्या दिशेने कारण नसताना धाव घेण्यास परवानगी कशी दिली जाते ? नुकत्याच झालेल्या एससीजीवरील कसोटीतील ऑस्ट्रेलियन खेळाडूंना असे घृणास्पद वर्तन करताना पाहून मी चिंतीत झालो. यासाठी दंड ठोठवायला हवा, असेही चॅपेल यांनी म्हटले आहे.









