नवीन लागवड थांबली, पावसाअभावी फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाअभावी यंदा भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आवक कमी होवू लागली आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर आता हळूहळू वाढताना दिसत आहेत. टोमॅटो, ढबू, बिन्स, वगळता इतर भाजीपाला प्रतिकिलो 50 रुपयांच्या पुढे गेला आहे. शिवाय येत्या काळात पुन्हा भाजीपाला वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
शनिवारच्या आठवडी बाजारात कोबीज 20 रुपये, फ्लॉवर 20 रुपये, बटाटा 30 रुपये, कांदे 25 रुपये, ढबू 40 रुपये, शेवग्याच्या शेंगा 20 रुपये, गाजर 60 रुपये, बिन्स 50 रुपये, वांगी 40 रुपये, भेंडी 40 रुपये, ओली मिरची 50 रुपये, टोमॅटो 10 रुपये, कारली 60 रु., दोडकी 60 रु., प्रतिकिलो, काकडी 60 रु., मेथी 15 रुपये एक पेंढी, लाल भाजी 10 रुपये पेंढी, कांदापात 20 रुपये 4 पेंढी, शेपू 10 रुपये, कोथिंबीर 10 रुपये पेंढी असे भाजीपाल्याचे दर आहेत.
पावसाअभावी पिकांची मोठी हानी झाली आहे. त्याबरोबर नवीन लागवड देखील थांबली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर भडकण्याची चिंता व्यक्त होत आहे. सद्यस्थित आवक स्थिर असली तरी काही भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. होलसेल भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याने किरकोळ बाजारात देखील आवक कमी झाली आहे. शिवाय गणेशोत्सवानंतर मांसाहारीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे भाजीपाल्याची खरेदी-विक्री मंदावली आहे.
टोमॅटो 10 रुपये किलो
मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गडगडले आहेत. किरकोळ बाजारात 10 रुपये किलो प्रमाणे विक्री होवू लागली आहे. काही ठिकाणी दर घसरल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. मागील महिन्यात 70 ते 80 रुपये किलो टोमॅटोचा भाव झाला होता. मात्र आता पुन्हा टोमॅटो 10 रुपये किलोवर घसरला आहे.









