वृत्तसंस्था/ बेनोनी
सध्या दक्षिण आफ्रिकेत आयसीसीची 19 वर्षाखालील महिलांची विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्व शेफाली वर्माकडे सोपवण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात शेफाली वर्माची फलंदाजी दर्जेदार झाली. भारतीय संघाने सलग दोन विजय नोंदवून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. शेफाली भारताच्या वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधीत्व करते. दरम्यान वरिष्ठ गटाच्या तुलनेत या 19 वर्षाखालील वयोगटात खेळताना आपल्याला वेगवान गोलंदाजीचा वेग कमी असल्याचे जाणवले, असे प्रतिपादन शेफालीने केले आहे.
भारताच्या वरिष्ठ महिला संघाचे शेफाली वर्माने आतापर्यंत दोन कसोटीत तसेच 21 वनडे आणि 51 टी-20 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. दक्षिण आफ्रिकेतील या स्पर्धेत यजमान संघाविरुद्धच्या सामन्यात तिने केवळ 16 चेंडूत 45 धावा झोडपत आपल्या संघाच्या विजयाला हातभार लावला. तर संयुक्त अरब अमिरातविरुद्धच्या दुसऱया सामन्यात शेफालीने 34 चेंडूत 78 धावा झळकवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टय़ा धिम्म्या असल्याने फलंदाजी करताना चेंडूचा वेग अधिक नसतो असेही तिने म्हटले आहे.









