तीन वर्षांत सहा हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण : प्रत्यक्षात 14 हजाराहून अधिक संख्या, ठेकेदार मिळत नसल्याने भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ
अमृत वेताळ/बेळगाव
शहर आणि ग्रामीण भागात सुमारे 22 हजारहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या असली तरी जुलै 2022 ते मार्च 2025 पर्यंत तीन वर्षांत महापालिकेकडून केवळ 5,889 भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. जुन्या ठेकेदाराची मुदत संपली असली तरीही महापालिकेच्या आरोग्य विभागाला कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी नवा ठेकेदार मिळत नसल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार केवळ बेळगाव शहरात 14 हजाराहून अधिक भटकी कुत्री आहेत. तर शहर आणि ग्रामीण भागात 22 हजाराहून अधिक कुत्र्यांची संख्या आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येत दरवर्षी झपाट्याने वाढ होत असल्याने कुत्र्यांच्या कळपाकडून नागरिकांचा चावा घेतला जात आहे. यापूर्वी अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या असून काही जणांना जीवदेखील गमवावा लागला आहे.
चालू महिन्यात शहरात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांनी शाळकरी मुलांसह महिला व वृद्धांचा चावा घेतला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस कंपनीला कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका 2022 मध्ये देण्यात आला होता. मात्र, सदर कंपनीचा ठेका संपुष्टात आल्याने नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यासाठी महापालिकेकडून निविदा मागविण्यात आली होती. पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाला दुसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ आली. नवीन ठेकेदार मिळत नसल्याने जुन्याच ठेकेदाराकडून सध्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी असली तरी निर्बिजीकरण मोजक्याच कुत्र्यांवर केले जात आहे. त्यामुळे कुत्र्यांची पैदास वाढतच चालली आहे. जुलै 2022 ते मार्च 2025 पर्यंत 2,060 नरांची तर 3,708 मादी जातीच्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. तीन वर्षांत एकूण 5,889 कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. उर्वरित कुत्र्यांचे निर्बिजीकरण केव्हा होणार, असा प्रश्न शहरवासियांतून विचारला जात आहे.
व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस कंपनीला ठेका
शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचा ठेका व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस कंपनीला देण्यात आला आहे. सदर कंपनीचा ठेका संपुष्टात आला असल्याने नवीन निविदा मागविण्यात आली आहे. नव्या ठेकेदाराची नियुक्ती होईपर्यंत जुन्याच ठेकेदाराकडून निर्बिजीकरण करण्याचे काम सुरू आहे. बेळगाव शहरात 14 हजार भटक्या कुत्र्यांची संख्या असून शहर आणि ग्रामीण भागात 22 हजाराहून अधिक कुत्र्यांची संख्या असण्याची शक्यता आहे.
– डॉ. संजीव नांद्रे,मनपा आरोग्याधिकारी









