कामात गती आणण्याची मागणी : अनेक लाभार्थी वंचित
प्रतिनिधी / बेळगाव
अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असलेल्या उमेश कत्ती यांच्या जिल्हय़ातच नवीन बीपीएल कार्ड वितरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. बीपीएल कार्ड वितरणाला गती द्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांतून होत आहे.
दोन वर्षांपासून बंद असलेल्या बीपीएल कार्ड वितरणाला मागील काही दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. लाभार्थ्यांनी बीपीएल कार्ड मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. मात्र अद्याप बऱयाच लाभार्थ्यांना नवीन रेशनकार्ड उपलब्ध झाले नाही. जिल्हय़ात 57017 लाभार्थ्यांनी बीपीएल कार्डासाठी अर्ज केला होता. त्यापैकी 33,933 लाभार्थ्यांना बीपीएल कार्डचे वितरण झाले आहे. उर्वरित लाभार्थी कार्डच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्हय़ात 14,57,925 रेशनकार्डधारक असून 48,44,618 लाभार्थी आहेत. दरम्यान, आर्थिकदृष्टय़ा सक्षम असलेल्या आणि बेकायदेशीर बीपीएल कार्ड मिळविलेल्या लाभार्थ्यांची कार्डे रद्द केली जात आहेत. त्याचबरोबर नवीन बीपीएल कार्ड वितरणाचे कामदेखील हाती घेतले गेले आहे. बीपीएल कार्ड अन्नभाग्य योजनेबरोबर आयुष्मान भारतसाठी ग्राह्य धरले जाते. दरम्यान, जिल्हय़ात बीपीएल कार्डधारकांची संख्याही अधिक आहे. शिवाय मागील काही महिन्यांपासून गरीब कल्याण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत आणि अतिरिक्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. शिवाय या योजनेची मुदतदेखील वाढविण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंत मोफत आणि अतिरिक्त धान्याचा लाभ घेता येणार आहे.