डुमरी पोटनिवडणुकीदरम्यान आक्षेपार्ह प्रकार
वृत्तसंस्था /गिरिडीह
झारखंडच्या डुमरी पोटनिवडणुकीत एआयएमआयएमच्या जाहीर सभेत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी प्रशासनाने आता कारवाईचे पाऊल उचलले आहे. एआयएमआयएम उमेदवार अब्दुल मोबिन रिझवी यांच्यासह पक्षाचे नेते मुजफ्फर हसन नुरानी समवेत अन्य काही जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे जाहीर सभेत बोलत असताना पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. ही घोषणाबाजी रोखण्याचा प्रयत्न ओवैसी यांनी केला होता. पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजीचा प्रकार आदर्श आचार संहितेचे उल्लंघन असल्याचे प्रशासनाकडून म्हटले गेले आहे. याप्रकरणी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने आवाज उठविला आहे. अशाप्रकारच्या देशद्रोहाशी निगडित प्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे. हेमंत सोरेन सरकारच्या कार्यकाळात राज्यात यापूर्वी देखील पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली असल्याचा आरोप भाजप खासदार संजय सेठ यांनी केला आहे.









