अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत धरणे धरणार : बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा, या मागणीसाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली ‘चलो मुंबई’चा नारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे होणार असून यादरम्यान म. ए. समितीच्यावतीने धरणे धरण्याचा निर्णय शनिवारी आयोजित मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मध्यवर्ती म. ए. समितीच्या सदस्यांची बैठक शनिवारी मराठा मंदिर येथे पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मुंबईला जाताना जागृतीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे येथील जिल्हाधिकाऱ्यांना, तसेच सर्वपक्षीयांना निवेदन दिले जाणार आहे. यासंदर्भात रविवार दि. 16 रोजी म. ए. समितीचे एक शिष्टमंडळ कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे आयुक्त दि. 18 व 19 रोजी बेळगाव भेटीवर येत आहेत. आयुक्तांसोबत म. ए. समितीच्या मागण्यांविषयी सविस्तर चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर बायपास, रिंगरोड याविरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच भेट घेतली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल चुकीची माहिती देणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकर यांचा बैठकीत निषेध करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार असून यावेळी म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्या दरम्यान सीमाप्रश्न, तसेच म. ए. समितीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कृत्य करू नये, अशा सूचना सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केल्या.
यावेळी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, अॅड. एम. जी. पाटील, रणजित चव्हाण-पाटील यांच्यासह बेळगाव शहर, तालुका व खानापूर म. ए. समितीचे सदस्य उपस्थित होते.
घरभेद्यांपासून सावध रहा
तालुका म. ए. समितीच्या युवा आघाडीतर्फे चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. परंतु, हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी काहीजणांनी खो घातला. कार्यक्रम रद्द झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले. अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी युवा आघाडीने केली होती. ज्या व्यक्तींनी कार्यक्रमामध्ये खो घालण्याचा प्रयत्न केला, अशा व्यक्तींपासून सावध रहा, अशा सूचना मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या.









