चंदगड प्रतिनिधी
चंदगड आगाराकडे सध्या नवीन बसेस उपलब्ध नसल्या तरीही लवकरच डेपोला नवीन गाड्या मिळतील. त्यातून तातडीने चंदगड ते बोरीवली मार्गावर स्लिपर कोच सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चंदगड आगारप्रमुख विजय शिंदे यांनी सांगितले.
चंदगड तालुक्यातील शाळा- महाविद्यालयीन बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 6 हजार असून त्यांच्या सोयीसाठी सुमारे 12 बसेस कार्यरत आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी तालुक्यातील शाळांतील शिक्षकांचा व्हॉटसअॅप ग्रुप बनवला असून त्याद्वारे येणाऱ्या सूचनांचे पालन करत कार्यक्षम सेवा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही विजय शिंदे यांनी सांगितले. कोरोना काळात राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली. अशा परिस्थितीत काही खासगी कंपन्यांनी गाड्या भाडेतत्वाने परिवहन महामंडळाला द्याव्यात, असे शासनाने केलेल्या आवाहनास खासगी कंपन्यांनी प्रतिसाद दिला. मात्र त्या गाड्या अधिक भारमान असलेल्या मार्गावरच दिल्या गेल्यामुळे त्याचा लाभ चंदगड डेपोला झालेला नाही.
चंदगड डेपोकडे सध्या 44 बसेस असून त्या सर्व सुस्थितीत आहेत. राज्य परिवहन मंडळावर आर्थिक भार पडू नये, या उद्देशाने सेवाभावी संस्था आणि समाजातील दानशूरांच्या सहकार्यातून चंदगड बसस्थानकाला रंग लावण्याबरोबरच विविध फलक लावण्यात आले आहेत. या कामासाठी 2 लाख 16 हजारांचा खर्च आला असून तो खर्च लोकांच्या दानतीतून पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य परिवहन महामंडळाकडे विविध स्वरूपाच्या 34 सवलतीच्या योजना आहेत. त्या सर्वसामान्य प्रवाशांना कळाव्यात, यासाठी फलक लावून माहिती देण्याचा संकल्प आहे. महिलांना बसप्रवासात 50 टक्के सवलत दिल्याने बसच्या भारमानात 20 टक्के वाढ झालेली आहे. 75 वर्षावरील वृद्ध प्रवाशांना संपूर्ण प्रवास मोफत दिल्यामुळे प्रत्यक्षात रोजचा गल्ला दिसत नसला तरीही सरकारी अनुदानात वाढ झाली आहे. वय वर्षे 3 ते 12 अर्धे तिकीट, त्यात महिलांना अर्धे तिकीट सुरू आहे. फक्त पुरूष 12 ते 65 या वयोगटात पूर्ण तिकीट काढतो. त्यामुळे प्रत्यक्ष रोजचा पैसा गोळा होत नसला तरी कागदावरच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधूनच प्रवास करावा. चंदगड ते मुंबई मार्गावरील खासगी प्रवासी वाहतुकीला पर्याय म्हणून स्लिपर कोचची बससेवा लवकरच चंदगड आगारामार्फत सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चंदगड आगारप्रमुख शिंदे यांनी सांगितले.









