बेड-उशी अन् प्रायव्हेट रुम देखील उपलब्ध
शाळेत ज्ञानार्जन करत मुले स्वत:च्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ जगत असतात. परंतु सध्या शाळांमध्ये आणखी अनेक अॅक्टिव्हिटी करविल्या जातात. या मुलांना अनेक गोष्टी शिकविल्या जातात. शाळा व्यवस्थापनांकडून या अॅक्टिव्हिटींच्या नावाखाली अनेक प्रकारचे शुल्क वसूल करण्यात येत असते. परंतु एखादी शाळा अॅक्टिव्हिटीज आणि खाण्यापिण्यासोबत झोपण्याचे शुल्क देखील वसूल करत असल्यास चकित व्हायला होते.

चीनमध्ये एका शाळेत अशाच प्रकारचे शुल्क वसूल केले जात आहे. या शाळेकडून मुलांना शिकविण्यासह झोपविण्यासाठी देखील शुल्क मागितले जात आहे. सोशल मीडियावर या शाळेच्या या अजब शुल्काचा विषय चर्चेत आला आहे. चीनच्या गुआंगडॉन्ग प्रांतात ही शाळा असून पालक या शाळेच्या मागणीमुळे चकित झाले आहेत.
गुआंगडॉन्ग प्रांतातील जेशेंड प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून नॅप फी म्हणजे झोपण्याचे शुल्क आकारण्यात येत आहे. शाळेच्या पालक-शिक्षक समुहाचे एक चॅट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मुलांवर नॅप चार्ज लावला जात असल्याचे नमूद आहे. यानुसार शाळेत मुले काही वेळासाठी झोपू शकतील आणि यादरम्यान ते शिक्षकांच्या देखरेखीत असणार आहेत. परंतु यादरम्यान मुलांना घरी जाण्याची मोकळीक असणार आहे. मुले शाळेत झोपी गेल्यास त्यांना शुल्क भरावे लागणार आहे.
मुलाने ब्रेकदरम्यान स्वत:च्या डेस्कवर डोकं टेवकून झोप घेतल्यास त्याला 200 युआन म्हणजेच 2300 रुपये द्यावे लागणार आहेत. जर वर्गात रितसर मॅट अंथरून झोपण्याची इच्छा असल्यास त्याला 360 युआन म्हणजेच 4500 रुपये द्यावे लागणार आहेत. झोपण्यासाठी स्वतंत्र खोली हवी असल्यास त्यात बेड देखील मिळणार आहे. याकरता त्याला 680 युआन म्हणजेच सुमारे 7800 रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.









