बेळगावमध्ये महिन्याला 30 ते 60 रुग्ण : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम
बेळगाव : बैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे तरुणाईलासुद्धा ‘स्लीप डिस्क’चा त्रास होऊ लागला आहे. युवापिढीमध्येही स्लीप डिस्कची समस्या जोरकसपणे पुढे येऊन लागली आहे. बेळगावमध्येही स्लीप डिस्कच्या विकाराने त्रस्त तरुणाईची संख्या झपाट्याने वाढत असून साधारणत: महिन्याला स्लीप डिस्कचे 30 ते 60 रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे वेळीच युवापिढीने आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. बैठी जीवनशैली, तासन्तास एकाच जागेवर बसणे किंवा उभे राहणे, क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलणे आदी कारणांमुळे स्लीप डिस्कची समस्या वाढली असून युवापिढी याला अधिक प्रमाणात बळी पडत असल्याचे चित्र आहे.
पाठीच कणा म्हणजेच ‘स्पायनल कॉर्ड’ अनेक लहान हाडांपासून बनलेला असतो. ही हाडे डोक्यापासून कंबरेपर्यंत एका दुव्याने जोडलेली असतात. या हाडांमध्ये मऊ उशासारख्या डिस्क असतात. ज्याप्रमाणे वाहनांमध्ये शॉक अॅब्झॉर्बर असतात, जे धक्के सहन करतात व आणि वाहन सुरळीत चालते, त्याप्रमाणे हाडांचे डिस्क शॉक शोषून घेतात आणि हाडे लवचिक ठेवतात. जेव्हा ते घसरतात किंवा फुटतात तेव्हा त्याला स्लीप डिस्क, असे म्हणतात. कधीकधी त्याची लक्षणे इतकी तीव्र असतात की चालताही येत नाही. याला मुख्यत: 15 ते 30 वयोगटातील मुले स्लीप डिस्कला बळी पडत आहेत.
अलीकडे स्लीप डिस्कच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यापैकी बरेचजण तासन्तास लॅपटॉपच्या स्क्रिनला चिकटून बसलेले असतात. टेबलावर सतत झुकून काम करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासह क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलणे, आजकाल जिमची फॅशन झाली असून मुले अधिक वजन उचलून बॉडी फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होत असून यामुळे पाठीचा कणा, मणक्याचे त्रास व कंबरदुखीने युवापिढी त्रस्त होत आहे. स्लीप डिस्क झाल्यामुळे पाठदुखी, हातपाय दुखणे, मान दुखणे, मणका दुखणे, कंबर दुखणे आदी समस्या उद्भवतात.
स्लीप डिस्कमुळे अनेकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. वयानुसार हाडांची ठिसूळता सामान्य असते. पण सुमारे 30 टक्के लोकांमध्ये एमआयआर स्कॅननंतर डिस्कमध्ये फुगवटा असल्याचे दिसून येते. लोक बराच एकाच जोगवर बसून राहून क्वचितच हालचाल करणे, ताणतणाव, व्हिटॅमिन डी व बी12 कमतरता, व्यायामाचा अभाव, क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलू नये. शक्यतो योगा करावा. कोरोनानंतर घरून काम करण्याची पद्धत अवलंबिली, याचा परिणाम आरोग्यावर होऊन स्लीप डिस्कचा त्रास पुढे आला. यापूर्वी फिजिओथेरपी व विश्रांतीने उपचार केले जात असत. पण आता आधुनिक उपचारपद्धती विकसित झाल्या असून याद्वारे योग्य उपचार करण्यात येत आहेत.
स्लीप डिस्कची कारणे
स्लीप डिस्क विकारतज्ञ डॉ. संजीवकुमार राठोड यांच्या मते एकाच जागेवर अधिक वेळ बसून राहणे, क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलणे, लांब पल्याचा प्रवास करणे, स्नायूंचा कमकुवतपणा, जास्त वाकून काम करणे ही स्लीप डिस्क होण्याची कारणे असून ते टाळण्यासाठी अधिक वेळ बसून न राहता हालचाल करावी, क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलू नये, जास्तीचा प्रवास टाळावा, अचानक जागेवरून उठू नये, दररोज 30 मिनिटे व्यायाम करावा, ज्यामुळे आपण स्लीप डिस्क टाळू शकतो किंवा नियंत्रणात ठेवू शकतो.









