बेळगाव : राज्यातील कत्तलखाना चालकांना विविध संघटनांच्या विरोधामुळे त्यांच्या उपजिवीकेवर परिणाम होत आहे. कुरेशी समुदाय कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करीत आहे. पण अलिकडच्या काळात कत्तलखाना चालकांच्या समस्या वाढल्या असून प्रशासकीय निर्बंधांनाही सामोरे जावे लागत आहे. परिणामी मूलभूत हक्कांसह उपजिवीकेवर परिणाम होत आहे. यासाठी समुदायाला मुक्त व्यवसाय करण्याची मागणी कुरेशी जमात चॅरिटेबल असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कत्तलखाना चालकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने उच्चस्तरीय समन्वयक बैठक बोलवावी. जेणेकरून आपल्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होणार आहे. तसेच व्यवसाय करण्यासाठी ऑनलाईन एपीएमसी व्यवहारांची अंमलबजावणी करावी. पशुधन वाहतूक परवाने जारी करावेत. राज्य महापालिका कायदा व संबंधित नागरी स्थानिक संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून स्थानिक पातळीवर सरकार मान्यताप्राप्त कत्तलखान्यांची स्थापना करावी. कोंडवाडा येथील गोठा त्वरित कार्यान्वित करावा. खोट्या एफआयआर, धमक्यांपासून कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी मोहसिन बेपारी, रिझवान बेपारी, मलिकसाब बेपारी, इम्तिहाज बेपारी, मोहम्मद गौस यांच्यासह कत्तलखाना चालक उपस्थित होते.









