किल्ल्याचा विकास करून प्रेक्षणीय स्थळ बनविणार : सर्वांच्या बलिदानाचे स्मरण आवश्यक
वार्ताहर /धामणे
राजहंसगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यात येणार असून शिवमूर्तीच्या चौथऱयाचे काम आता प्रगतिपथावर आहे. या चौथऱयाचा स्लॅबभरणी कार्यक्रम रविवार दि. 29 रोजी उत्साही वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राजहंसगड किल्ल्याचा विकास व सौंदर्यीकरण करून बेळगाव जिल्हय़ातील एक प्रेक्षणीय स्थळ करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राजहंसगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती बसविण्यासाठी चौथऱयाचा
स्लॅब घालण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सुरुवातीला गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात विधिवत पूजन करण्यात येऊन आरती झाली. त्यानंतर सुरू असलेल्या चौथऱयाचे स्लॅबभरणी पूजन कर्नाटक विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ते म्हणाले, राजहंसगड हे जिल्हय़ातील आदराचे आणि प्रेक्षणीय स्थळ बनविण्यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि मी कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केल्याचे आणि संगोळ्ळी रायण्णा, कित्तूर चन्नम्मा, बेळवडी मल्लम्मा, विश्वगुरू बसवाण्णा व इतर अनेकांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्या सर्वांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून त्यांचा सदैव सन्मान करणे महत्त्वाचे आहे, असेही ते पुढे म्हणाले. या पूजनप्रसंगी गावातील सुवासिनी मंगल कलश घेऊन उपस्थित होत्या. इंजिनिअर मल्लेशी मुतगेकर, किरण चतुर, अनंत गुरव, सचिन सामजी, सिद्धाप्पा छत्रे, शिवाजी बस्तवाडकर, लक्ष्मण चव्हाण, मल्लिकार्जुन कुरबर, शुभम थोरवत, भाऊराव पवार, पिंटू कुंडेकर त्याचप्रमाणे गावातील नागरिक व महिला मोठय़ा संख्येने यावेळी उपस्थित होत्या.









