इमारतीचे काम पूर्णत्वाकडे, लवकरच प्रवाशांच्या सेवेत, पार्किंगची भव्य सोय
बेळगाव : प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी सीबीटी बसस्थानकाची बहुमजली इमारत उभारली जात आहे. मागील काही दिवसापासून संथगतीने सुरू असलेल्या कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे काम प्रगतीपथावर सुरू आहे. मात्र यासाठी तब्बल पाच वर्षांचा कालावधी लागला आहे. अद्यापही अंतर्गत फर्निचर, फरशी आणि इतर कामे शिल्लक आहेत. त्यामुळे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार, असा प्रश्न पडू लागला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल 31 कोटीच्या निधीतून सुसज्ज बसस्थानक उभारले जात आहे. दोन बसस्थानकांपैकी एका बसस्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. शिवाय प्रवाशांच्या सेवेतदेखील दाखल झाले आहे. मात्र दुसऱ्या बसस्थानकाचे काम रखडले आहे. विशेषत: दोन्ही बसस्थानके जोडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था केली आहे. मात्र हे कामदेखील रेंगाळले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीत असलेल्या तब्बल 32 गुंठे जागेत हे बसस्थानक उभारले जात आहे. मध्यंतरी कॅन्टोन्मेंटने काम थांबविण्यासाठी परिवहनला नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे काही काळ काम रेंगाळले होते. शिवाय कोरोनाचा देखील ब्रेक लागला होता. मात्र आता पुन्हा कामाला जोर आला आहे. तुमकूर येथील एका कंपनीला या कामाची जाबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र कामगारांचा अभाव आणि इतर कारणांमुळे कामाला विलंब होऊ लागला आहे. उभारण्यात येत असलेल्या बहुमजली बसस्थानकाच्या चौथ्या मजलीची स्लॅब भरणी मंगळवारी करण्यात आली. मात्र अद्यापही अंतर्गत खोल्या, यात्रीनिवास, शौचालये, पार्किंग, फलाट आणि इतर कामे शिल्लक आहेत. त्याचबरोबर कँटीनसाठीदेखील गाळे उभारले जाणार आहेत. त्यामुळे हे गाळे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून परिवहनला आधार ठरणार आहेत. विशेषत: तळमजल्यात भव्य पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. एकाचवेळी हजारो दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करण्याची क्षमता असलेली पार्किंग उभारले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या पार्किंगचा प्रश्नदेखील मार्गी लागणार आहे.
काम संपविण्यासाठी सप्टेंबरची डेडलाईन
काम लवकर संपविण्यासाठी कंपनीला बजावण्यात आले आहे. मात्र कंपनीकडून वेगवेगळी कारणे पुढे करून कामास विलंब केला जात आहे. काम संपविण्यासाठी सप्टेंबर महिन्याची डेडलाईन देण्यात आली आहे. कंपनीकडूनच कामास विलंब होत आहे. शिवाय संबंधितांना काम लवकर संपविण्यासाठी आदेश देण्यात आले आहे.
– के. के. लमानी (डीटीओ परिवहन खाते)









