पुणे / प्रतिनिधी :
पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीत बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याने (slab collapse five workers injured) झालेल्या दुर्घटनेत पाच मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
वानवडी परिसरातील अलंकार हॉलसमोरील एका इमारतीत बांधकाम सुरू होते. दोन स्लॅबचे काम पूर्ण होऊन तिसऱ्या स्लॅबचे काम सुरू होते. त्याकरिता सोमवारी सकाळपासून कामगारांनी लाकडी बांबूने स्लॅब बांधून खडी, सिमेंट तिसऱ्या स्लॅबच्या ठिकाणी पोहोचवले. मात्र, दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अचानक स्लॅब कोसळून पाच मजूर खाली पडले आणि जखमी झाले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाकडून तसेस पोलिसांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.