वृत्तसंस्था/ लंडन
विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत ब्रिटनचा नील स्कुपस्की व त्याचा हॉलंडचा साथीदार वेस्ली कूलहॉफ यांनी जेतेपद पटकावले. या अग्रमानांकित जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत 15 व्या मानांकित स्पेनचा मार्सेल ग्रॅनोलर्स व अर्जेन्टिनाचा होरासिओ झेबालोस यांच्यावर 6-4, 6-4 अशी मात केली. 33 वर्षीय स्कुपस्की हा विम्बल्डन दुहेरीत 2012 नंतर जेतेपद मिळविणारा पहिला ब्रिटिश खेळाडू आहे. याआधी 2012 मध्ये जोनाथन मरेने फ्रेडरिक नील्सनच्या साथीने येथे जेतेपद मिळविले होते. 2021 व 2022 मध्ये स्कुपस्कीने मिश्र दुहेरीची अजिंक्यपदेही मिळविली होती. त्याचे हे एकंदर तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. ग्रॅनोलर्स व झेबालोस दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाले आहेत. यापूर्वी 2021 मध्ये त्यांना निकोला मेक्टिक व मेट पॅव्हिक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.