वृत्तसंस्था/नवी दिल्ली
झेक प्रजासत्ताकमधील ऑटो क्षेत्रातील कंपनी स्कोडा ऑटो यांनी आपले लक्ष भारतावर केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. यायोगे कंपनी आपले युरोपवरील अवलंबत्व कमी करणार असल्याचे सांगितले जात आहे. स्कोडा ऑटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ क्लाऊज झेलमर यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे. भारतामध्ये येणाऱ्या काळामध्ये कंपनी विस्ताराची योजना बनवत आहे. विकसनशील देशांमध्ये भारताचा समावेश असून आगामी काळात बॅटरी इलेक्ट्रीक वाहने उतरविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. युरोपमध्ये आम्ही मजबूत असून क्रमांकामध्ये पाहता तिसऱ्या क्रमांकावर आहोत. कंपनीचा विकास हा आश्वासक असून बऱ्यापैकी नफाही कंपनी प्राप्त करते आहे. जागतिक स्तरावर कार निर्मितीमध्ये चांगला नफा मिळविणारी कंपनी म्हणून आमच्याकडे पाहिले जाते, असेही ते म्हणाले. आम्ही फक्त युरोपवरच लक्ष केंद्रित करत होतो आणि त्या देशावरच अवलंबून राहत होतो. पण आता हा विचार आम्ही बदलला असून आमचे लक्ष आता विकसित भारतावर असेल. चीन आणि अमेरिका या दोन देशांवर अवलंबून असणाऱ्या कंपन्यांना अनेक अडचणी झेलाव्या लागल्या आहेत. म्हणूनच आम्ही आता भारतात विस्तारासाठी उतरणार आहे.









