मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आलेल्या रोजगारपूर्व प्रशिक्षण योजनेमुळे ‘हर घर कौशल्य’ निर्माण होणार आहे. त्यामुळे युवकांमध्ये आत्मविश्वास वाढून ते स्वावलंबी बनण्यास मदत होणार असून भविष्यात बेकारीची समस्या खात्रीने कमी होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. नोकरीच्या प्रतीक्षेत बेकार राहण्यापेक्षा युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी रोजगारपूर्व प्रशिक्षण योजनेखाली निवडण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून ताळगाव येथील सामाजिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार जेनिफर मोन्सेरात, राजेश फळदेसाई, ऊडाल्फ फर्नांडिस, भाजपाध्यक्ष सदानंद तानावडे, महापौर रोहित मोन्सेरात, गौरीश धोंड, कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे संचालक एस. गावकर, टाटा टेक्नॉलॉजीचे पवन कुमार भागेरिया आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री सावंत यांच्याहस्ते यावेळी पोलीस, शिक्षण, वन, साबांखा, नदी परिवहन, अन्न व औषध प्रशासन, उच्च शिक्षण, समाजकल्याण, वीज, जिल्हाधिकारी, लेखा, अबकारी, श्रम व रोजगार, माहिती तंत्रज्ञान, मच्छीमार, क्रीडा, आदी सरकारी खात्यांसह राज्यातील विविध खासगी कंपन्या व आस्थापनातही निवड झालेल्या हजारो उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
टाटा टेक्नॉलॉजी संस्थेचे साहाय्य
पुढे बोलताना त्यांनी, गोमंतकीय युवकांमध्ये प्रचंड कौशल्य आहे, याची झलक वेळोवेळी मिळत असते. त्यांच्यातील या कौशल्यास योग्य प्रशिक्षणाची जोड देऊन प्रोत्साहन दिल्यास ते अधिक प्रगल्भ बनतील, असा विश्वास व्यक्त केला. याच उद्देशाने राज्यातील 10 सरकारी आणि 3 खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याकामी टाटा टेक्नॉलॉजी संस्थेचे साहाय्य घेण्यात येणार असून टाटा ग्रूपतर्फे 170 कोटी ऊपये गुंतवणूक करण्यात येतील तर उर्वरित 70 कोटी खर्चाचा वाटा गोवा सरकार उचलणार आहे. यातील पहिला प्रकल्प असलेल्या आल्तिनो पणजी येथील आयटीआय केंद्राचे आजच उद्घाटन करण्यात आले आहे, या केंद्रावर सुमारे 3.5 कोटी खर्च केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
एकाच दिवशी दहा ठिकाणी कार्यक्रम
राज्यात काल एकाच दिवशी सुमारे 10 ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याद्वारे सुमारे 9 हजार जणांना पहिल्या टप्प्यात नियुक्तीपत्रे देण्यात आली. या योजनेंतर्गत 10 हजार जणांना सामावून घेण्याचा उद्देश होता. मात्र त्याला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता व त्याखाली 6400 जणांना सरकारी तर 8600 जणांना खासगी कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून ऊजू करून घेण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
पुस्तकी ज्ञानास कौशल्याची जोड हवी
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी बोलताना, पुस्तकी ज्ञानास कौशल्याची जोड दिल्यास युवकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत होईल. त्यातून ते आत्मनिर्भर बनतील, असा विश्वास व्यक्त केला. सरकारी नोकरीवर विसंबून राहिल्यास विरस होतो व त्यातून एखाद्यामधील आत्मविश्वास ढासळतो. त्यामुळे युवकांनी अशा प्रशिक्षणासारख्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमादरम्यान सरकार आणि अनेक खासगी कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. त्याद्वारे राज्यात रोजगारपूरक उद्योगांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने काम हाती घेण्यात येणार आहे. या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने टाटा टेक्नॉलॉजी, जाग्वार, दायकिन, यशस्वी स्किल्स आदींचा समावेश होता.
पंतप्रधान मोदी यांचा शुभेच्छा संदेश
कौशल्य विकास खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर यांनी स्वागत केले. तसेच या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवला. मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केल्यानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले. मडकई येथील पथकातर्फे समई नृत्याचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले. त्याशिवाय संकेत मांद्रेकर या युवकाने आपल्या कौशल्याचे लाईव्ह प्रदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची चित्रे कॅन्व्हासवर लिलया रंगवून उपस्थितांची वाहवा मिळविली. कार्यक्रमास विविध कंपन्यांचे अधिकारी, सरकारी अधिकारी, अन्य मान्यवर व प्रशिक्षणार्थी उमेदवार उपस्थित होते.
’अॅप्रेन्टिसशीप’ शब्दाचा बट्ट्याबोळ!
दरम्यान, या योजनेची विविध माध्यमावरून जाहिरात करणाऱ्यांनी मात्र ‘अॅप्रेन्टिसशीप’ शब्दाचाच बट्ट्याबोळ केल्याचे दिसून आले आहे. एका रेडिओ केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या जाहिरातीत हा शब्द चक्क ’अॅप्रेन्टिनशीप’ असा उच्चारण्यात येत आहे तर अन्य एका जाहिरातीत ‘अॅप्रेन्टिशीप’ म्हणून वापरण्यात आला आहे.
‘अॅप्रेन्टिस’ या मूळ शब्दावरून ‘अॅप्रेन्टिसशीप’ शब्द वापरात येतो. परंतु आकाशवाणीसारख्या माध्यमांवर जाहिरातीत आवाज देणाऱ्या उच्च शिक्षितांनासुद्धा तो धड उच्चारता येऊ नये यावरून आजच्या शिक्षणव्यवस्थेची दशा लक्षात येते. जाहिरातीत जेमतेम चार शब्द असतात. परंतु त्यांची स्पष्टता किंवा सत्यता लक्षात घेण्याची तसदीसुद्धा कुणी घेत नाहीत. त्यातून मग असे भन्नाट शब्द जन्मास येतात.









