मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा : पंतप्रधान करणार दहा हजार युवांना मार्गदर्शन,राज्यात ‘कार्य संस्कृती’ वाढविण्याचे आवाहन
पणजी : राज्यात पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींची संख्या मोठी आहे. शिक्षण घेतल्यानंतर हे पदवीधर नोकरी मिळावी यासाठी आमदार, मंत्री, खासदार यांचे उंबरठे झिजवतात. किंबहुना ते सरकारवर अवलंबून राहतात. सर्वच मुलांना सरकारी नोकरी मिळणे अशक्य आहे. यावर उपाय म्हणून राज्यात आता स्किल डेव्हलपमेंट पोर्टल अॅप तयार करण्यात येत असून, येत्या 15 जुलैला ‘स्किल डेव्हलपमेंट डे’ साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील दहा हजार मुलांना एकाचवेळी व्हर्च्युअल पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्यातील उद्योजकांसाठी काल शुक्रवारी पणजीत आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी गोवा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी. एस. पै आंगले व उपस्थितांमध्ये श्रीनिवास धेंपो, अनिल खंवटे व अन्य उद्योजक उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात ‘कार्य संस्कृती’ (वर्क कल्चर) वाढविण्याची फार मोठी गरज आहे. यासाठी राज्यातील उद्योजकांनी जबाबदारी घेणे गरजेचे आहे. इयत्ता आठवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपापल्या उद्योगाच्या ठिकाणी शिकाऊ उमेदवार म्हणून उद्योजकांनी घ्यायला हवे. त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार वेतन देण्याचाही विचार करायला हवा. या शिकाऊ उमेदवारांना उद्योगासंबंधी ज्ञान देऊन त्यांची सरकारच्या ‘स्किल डेव्हलपमेंट पोर्टल’वर नोंदणी करावी, असेही ते म्हणाले.
उद्योजकांनी सरकारकडे आपली मते मांडावीत
अनेक उद्योग राज्यात येऊ पाहताहेत. यामध्ये गोमंतकीय जनतेला नोकऱ्या मिळणे गरजेचे असून, कौशल्यप्राप्त युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट पोर्टल हे उपयुक्त ठरणार आहे. विरोधाला विरोध म्हणून आडकाठी आणली जाते. यामुळे उद्योजकांचे अधिक नुकसान होते. उद्योजकांनी वेळोवेळी सरकारकडे आपली मते मांडावीत, त्यातून आपण राज्याच्या विकासासाठी विचार करू शकतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्राच्या निधीचा योग्य वापर व्हावा
ओबीसी, एससी व एसटी महामंडळालाही कामाला लावले असून, ही महामंडळे केंद्रातून येणाऱ्या फंडाचा फारसा उपयोग करीत नव्हती. त्यामुळे हा केंद्राचा निधी परत जात होता. परंतु आता या तिन्ही महामंडळांना योग्य सूचना करण्यात आल्याने केंद्रातून आलेल्या निधीचा वापर महामंडळाचे कार्य वाढविण्याबरोबरच गोव्याच्या विकासात भर घालण्यास महत्त्वाचा ठरणार आहे.
पाच हजार युवक, युवतींना तयार करा
राज्यात 15 जुलै रोजी स्किल डेव्हलपमेंट डे साजरा करण्यात येणार असून, या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्योजकांनी भावी सक्षम उद्योजक तयार करण्यासाठी किमान पाच हजार मुलांची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील उस्त्रोजकांना केले.
बेकायदेशीर उद्योगांचा ‘डाटा’ संकलन सुरू
राज्यात प्रामाणिकपणे उद्योग करणाऱ्या उद्योजकांमुळे राज्याचा चौफेर विकास सुरू आहे. तरीही काहीजण छुप्या मार्गाने, माहिती लपवून बेकायदेशीर उद्योsग चालवत आहेत. अशांवर सरकारची करडी नजर असून, सरकारी यंत्रणेमार्फत बेकायदेशीर उद्योग करणाऱ्यांचा ‘डाटा’ संकलीत केला जात आहे. बेकायदेशीर उद्योग, व्यवसाय करणाऱ्यांची आपण गय करणार नसून, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी उद्योजकांच्या बैठकीत दिले.
गोवा आर्थिक विकास महामंडळाची भरीव मदत
गोवा आर्थिक विकास महामंडळ खऱ्या अर्थाने 2000 सालानंतर मूर्त स्वऊपात आले आहे. महामंडळाने मुख्यमंत्री रोजगार योजना व इतर विविध योजनांद्वारे कामगारनिर्मिती करण्याबरोबरच सरकारला विविध प्रकारे आर्थिक मदत केली आहे. गेल्या चार वर्षांत 800 कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली आहेत. त्यातून महामंडळाला सुमारे 200 कोटीचा नफा झाला आहे. 52 कोटी ऊपये सरकारच्या तिजोरीत कर स्वऊपात भरण्यात आले आहेत. शिवाय 40 कोटी ऊपये सरकारला विविध कामातून मिळवून दिल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.









