पत्रकार परिषदेत माहिती : सरकारी कार्यशाळा-प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजन
बेळगाव : उद्यमबाग येथील शासकीय कार्यशाळा आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे गुरुवार दि. 24 रोजी दहावी विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कौशल्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाबाबत मनात प्रश्न निर्माण होतात. यासाठी या शिबिरात विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाबाबत योग्य मार्गदर्शन केले जाणार, अशी माहिती शासकीय कार्यशाळा आणि प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य राजकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातून दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या सर्व विद्यार्थ्यांना एसएसएलसी नंतरच्या तांत्रिक प्रशिक्षणाची माहिती दिली जाणार आहे. त्याबरोबर कोणता अभ्यास निवडावा आणि नोकरीच्या संधी याबाबतही चर्चा केली जाणार आहे. गुरुवार दि. 24 रोजी कॅम्प येथील सेंट अॅन्थोनी हायस्कूलमध्ये हे शिबिर होणार आहे. या शिबिरात शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचाही सहभाग राहणार आहे. शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.









