प्लॅटिनम चषक क्रिकेट : बीएसई-लायाज सामन्यात पावसाचा व्यत्यय
बेळगाव : एसकेई सोसायटी स्पोर्ट्स अकादमी व हनुमान स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत प्लॅटिनम चषक 14 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनदिवशी एसकेई क्रिकेट अकादमीने रॉजर क्रिकेट क्लबचा 8 गड्यांनी पराभव करून विजयी सलामी दिली. तर लायाज क्रिकेट अकादमी व बेळगाव स्पोर्ट्स क्लब या सामन्या दरम्यान पावसाने हजेरी लावल्यामुळे दोन्ही संघांना एक गुण देण्यात आला. सिद्धांत मेणसे एसकेई याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भाग्यनगर येथील प्लॅटिनम मैदानावरती आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एसकेई सोसायटी अकादमीचे चेअरमन आनंद सराफ, अध्यक्ष अरविंद हलगेकर, उपाध्यक्ष अशोक शानभाग, प्रा. विनय नाईक, प्रा. महेश शिंदे, प्रा. रामकृष्ण एन., प्रा. सुजाता बिजापुरे, सरनोबत, कार्तिक गुरव, नागेश अनगोळकर व प्रमोद जपे आदी मान्यवर उपस्थित होते. यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सामन्यात रॉजर क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 16.3 षटकात सर्व गडी बाद 53 धावा केल्या. रॉजरच्या एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. एसकेईतर्फे सिद्धांत मेणसेने 3 धावात 3, समर्थ पाटीलने 2 धावात 2 तर वेदांत पाटील, विनायक चव्हाण,वैभव तवनोजी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेई क्रिकेट अकादमीने 14.4 षटकात 2 गडी बाद 54 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात आदित्य जाधव 2 चौकारासह 27 धावा केल्या. रॉजर्सतर्फे ऋतुराज जाधव व रजत संभाजीचे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात लायाज क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडी बाद 93 धावा केल्या. त्यात कलश बेनकट्टीने 2 चौकारासह 31, सिद्धार्थ आधिकारीने 22 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब बी तर्फे मंथन माईनकरने 14 धावात 2, सुजल इटगी व मयुर जाधव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब ने 3.4 षटकात 2 गडी बाद 8 धावा केल्या असता पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.