वृत्तसंस्था/ अबु धाबी
येथे सुरु असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी होणाऱ्या पाक विरुद्धच्या सुपर 4 फेरीतील सामन्यात भारतीय संघातील अष्टपैलू अक्षर पटेलच्या सहभागाविषयी दुखापतीच्या समस्येवरुन साशंकता व्यक्त केली जात आहे.
या स्पर्धेतील शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या ओमान विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत झाली होती. ओमानच्या डावातील 15 व्या षटकात हमाद मिर्झाने अक्षर पटेलच्या दिशेने मारलेला फटका झेलण्याच्या प्रयत्नात तो चेंडू त्याच्या डोक्यावर आदळला. मात्र ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी. दिलीप यांनी सांगितले. पण पाकविरुद्धच्या सामन्याला आता 48 तासांपेक्षा कमी कालावधी असल्याने अक्षर पटेलच्या या दुखापतीबाबत थोडी चिंता व्यक्त केली जात आहे. सामन्यापूर्वी त्याची तंदुरूस्ती चाचणी घेतली जाईल. या सामन्यात अक्षर खेळू शकला नाही तर भारताला एका फिरकी गोलंदाजाची कमतरता भासेल. त्यामुळे कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे दोन प्रमुख फिरकी गोलंदाज राहतील. मात्र रियान पराग आणि वॉशिंग्टन सुंदर या राखीव खेळाडूंपैकी एकाला संधी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या स्पर्धेत प्राथमिक गटातील झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गड्यांनी पराभव केला होता.









