केएससीए फोर्थ डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए फोर्थ डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात केआर शेट्टी लायाज संघाने एमसीसीसी अकादमीचा 60 धावांनी तर एसके सोसायटी क्रिकेट अकादमी संघाने गोकाक क्रिकेट क्लबचा 34 धावांनी पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. शुभम खोत, प्रेम पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. य् ाgनियन जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या फोर्थ डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात केआर शेट्टी लायाज क्रिकेट अकादमी प्रथम फलंदाजी करताना 28 षटकात 9 गडी बाद 184 धावा केल्या. त्यात शुभम खोतने 7 चौकारांसह 62, सुनिल सक्रीने 4 षटकारांसह 35, सुनिल नायडूने 3 चौकारांसह 19 धावा केल्या. एमसीसी अकादमीतर्फे फिरोज खतीबने 15 धावात 4, इरफान हाजीने 21 धावात 3 तर अर्सलीन व आरूश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसीसी अकादमीचा डाव 25. 1 षटकात 124 धावात आटोपला. यश विहानने 2 चौकारांसह 54, फिरोज खतिब रोशन तालबेलकर यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे वशिम धामणेकरने 34 धावात 3, सलील कोरडेने व सुनील सक्री यांनी प्रत्येकी 2 तर शिवाजी पाटीलने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात एसके सोसायटी क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 57. 5 षटकात सर्व गडी बाद 141 धावा केल्या. त्यात प्रेम पाटीलने 5 चौकारांसह 32, अशोक सिंगने नाबाद 21, गौरव टी., विनय नाईक यांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. गोकाक क्रिकेट क्लबतर्फे सिद्धू टी. ने 26 धावात 4, अनिल पाटीलने 2 तर आनंद कण्णूर, युनूस, महेश यांनी प्रत्येक 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना गोकाक क्रिकेट क्लबचा डाव 21 षटकात 107 धावात आटोपला. त्यात महेशने 5 चौकारांसह 32, रवी डी. ने 3 चौकारांसह 21, शुभम सी. ने 20 धावा केल्या. एसकेईतर्फे प्रेम पाटील 25 धावात 5, कार्तिक गुरवने 2 तर विनय नाईक, गौरव टी. व मथंन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









