एफएसटी पथकाची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
तेग्गीहाळ, ता. सौंदत्ती येथील एका फार्महाऊसवर छापा टाकून 1600 कुकर जप्त करण्यात आले आहेत. यांची किंमत 21 लाख 32 हजार 958 रुपये होते. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून एफएसटी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी ही कारवाई केली आहे.
विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासून जिल्ह्यात कुकर, मिक्सर, डबे वाटपासंबंधी अधूनमधून बातम्या ऐकायला मिळत होत्या. निवडणुका जाहीर होण्याआधीच काही उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांना देण्यासाठी भेटवस्तू साठवून ठेवल्या आहेत. आता त्या जप्त करण्याची मोहीम अधिकाऱ्यांनी हाती घेतली आहे.
तेग्गीहाळ हे गाव सौंदत्ती व रामदुर्ग तालुक्याच्या सीमेवर आहे. एका फार्महाऊसमधील पत्र्याच्या शेडमध्ये भेटवस्तू साठवून ठेवल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी एफएसटी पथकाला याची खात्री करण्याची सूचना केली. त्यांच्या सूचनेवरून शनिवारी छापा टाकण्यात आला.
कर्नाटक अबकारी कायदा 1965 कलम 54 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून एफएसटी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पत्र्याच्या शेडचा दरवाजा उघडून पाहिला असता या शेडमध्ये 1600 कुकर आढळून आले. हे कुकर जप्त करण्यात आले असून ते कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराचे आहेत, याचा तपास करण्यात येत आहे.









