प्रत्येकी 50 हजारांचा दंडही
बेळगाव : राजकीय वैमनस्यातून पती-पत्नींचा खून करणाऱ्या 16 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले होते. सोमवारी सर्वांनाच जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. बेळगाव न्यायालयातील एकाचवेळी 16 जणांना जन्मठेप होणारी ही पहिलीच सुनावणी असून याबद्दल सरकारी वकिलांचे अभिनंदन होत आहे. दरम्यान आपल्या बहिणीच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी तब्बल 13 वर्षे भावांनीदेखील लढा दिला. भावांना राखी बांधून परत आपल्या गावी जाणाऱ्या बहिणीचा आणि तिच्या पतीचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने 16 जणांना दोषी ठरविले होते. बेळगावातील दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये तब्बल 13 वर्षे हा खटला चालला. खून झालेल्या महिलेच्या भावानेदेखील न्यायासाठी पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले असून साऱ्यांना जन्मठेप झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. राजकीय वैमनस्यातून रामचंद्र अप्पय्या अरेर (वय 40) आणि पार्वती अरेर (वय 35, दोघेही रा. तिगडोळी, ता. बैलहोंगल) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांचा राजकीय वर्चस्वातून मयत बाळाजा कुदळी, मुख्य आरोपी राजू कुबेरप्पा क्यातन्नावर, बसाप्पा शिरगापूर, मयत बसाप्पा मुगळी, दुंडाप्पा पारिश्वाड, शिवलिंगय्या बानिमठ, अजित क्यातन्नावर, शिवाजी संभोजी, तवणाप्पा कलगौडर, कल्लाप्पा जायक्कण्णावर, सावंत किरबन्नावर, संतोष मडिवाळकर, बाबु मंडेद, मंजू जाक्यण्णावर, मयत पारिस रेंटी, सातू शिरगापूर (सर्व रा. तिगडोळी, ता. बैलहोंगल), बाळू उर्फ सिंदूर उर्फ गोपीनाथ मुचंडी (रा. रामदेव गल्ली, वडगाव), अनिल बसाप्पा उपरी (रा. वडगाव), दीपक होसुरकर (रा. जुने बेळगाव) अशी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील किरण ऊर्फ विनायक परिट (रा. बेळगाव) हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तिगडी ग्राम पंचायत अध्यक्ष म्हणून मयत पार्वती रामचंद्र अरेर या कार्यरत होत्या. त्या उत्तमप्रकारे ग्राम पंचायतीचे काम पाहत होत्या. त्यांचे पती रामचंद्र हे सरकारी कंत्राटी कामे घेत होते. ग्राम पंचायतमधीलही कामे दुसऱ्यांच्या नावे घेऊन ते करत होते. याच ग्रामपंचायतमध्ये आरोपी राजू कुबेरप्पा क्यातन्नावर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. त्यामुळे त्यांना या दोघांवर राग होता. बऱ्याचवेळा वादावादी, भांडणे झाली. मात्र रामचंद्र व त्यांच्या पत्नीने त्याकडे दुर्लक्ष केले आणि ग्रामपंचायतीच्या कामांकडे लक्ष दिले होते. काही केल्या हे दाम्पत्य दाद देत नसल्याचा राग मुख्य आरोपीच्या मनात होता.
त्यामुळे त्याने त्यांचा काटा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार कट रचून त्यांच्यावर पाळत ठेवली होती. रक्षाबंधनसाठी पार्वती आणि रामचंद्र हे बेळगावला जाणार असल्याची माहिती मिळाली. दि. 13 ऑगस्ट 2011 रोजी रक्षाबंधनसाठी आदर्शनगर-वडगाव येथील आपल्या माहेरी पार्वती व तिचा पती रामचंद्र हे आले होते. भावांना राखी बांधून जेवण करून हे दोघेही दुचाकीवरून तिगडोळीकडे चालले होते. पाळत ठेवून असलेले आरोपी त्यांचा पाठलाग करत होते. नेग्गूर-बोगूर या रस्त्यावरील हुनशीकट्टी यांच्या शेताजवळ या दोघांना अडविले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये रामचंद्र आणि पार्वती यांचा मृत्यू झाला होता. फिर्यादी रमेश यांच्यासह काहीजण घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी वरील सर्व संशयितांच्या विरोधात नंदगड पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून वरील सर्वांना अटक केली होती. पोलिसांनी या सर्वांवर भा.दं.वि. 143, 147, 148, 120(बी), 341, 302, सहकलम 149 अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी येथील दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले होते. त्याठिकाणी हे सर्वजण दोषी आढळले. न्यायालयामध्ये 32 जणांची साक्ष, 84 कागदपत्रे पुरावे, 28 मुद्देमाल तपासण्यात आले. न्यायाधीश ईरण्णा ई. एस. यांनी या सर्वांना जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावला. बेळगाव न्यायालयात 16 जणांना जन्मठेपीची शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद

या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून आर. ए. बारावली यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. न्यायालयामध्ये प्रत्येक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक मांडली. ही घटना समाजाला काळीमा फासणारी असून या सर्वांना जास्तीतजास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद केला होता. त्याला यश आले. न्यायाधीशांनी या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.









