टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत चौथा : बटलरला टाकले मागे, आता रोहितचा रेकॉर्ड निशाण्यावर
वृत्तसंस्था/ मुंबई
सूर्यकुमार यादव टी 20 क्रिकेटमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये दिसतो. त्याला वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळाले नाही पण टी 20 मध्ये मात्र त्याने चांगलाच जम बसवला आहे. ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात सूर्यकुमारने आणखी एक माईलस्टोन आपल्या नावे केला. इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जोस बटलरला मागे टाकत सूर्यकुमार टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील चौथा फलंदाज बनला आहे. बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात त्याने 3 षटकार लगावत हा कारनामा आपल्या नावे केला.
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक षटकार आहेत. सिक्सर किंग हिटमॅनने 159 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 205 षटकार लगावले आहेत. या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल दुसऱ्या स्थानी असून त्याने 173 षटकार मारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील निकोलस पूरनने 144 षटकार ठोकले आहेत. आता 139 षटकार मारत सूर्यकुमार यादव या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने 137 षटकार मारले असून तो चौथ्या स्थानावरून आता पाचव्या स्थानावर घसरला आहे. सूर्याचा फॉर्म पाहता बांगलादेशविरुद्ध उर्वरित दोन लढतीत तो पूरनला लवकरच मागे टाकू शकतो.
रोहितचा रेकॉर्ड निशाण्यावर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याशिवाय, न्यूझीलंडचा गुप्टीलही निवृत्त झाला आहे. टी 20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित अव्वलस्थानी आहे. रोहितचा हा रेकॉर्ड मोडण्याची सूर्याला नामी संधी आहे. सूर्या आता 34 वर्षाचा आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता हा रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची मोठी संधी आहे. आगामी काळात तो अशीच कामगिरी करण्यात यशस्वी ठरला, तर तो या फॉरमॅटमध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनेल, यात शंका नाही.
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
- रोहित शर्मा (भारत) – 159 सामन्यात 205 षटकार
- मार्टिन गुप्टील (न्यूझीलंड) – 122 सामन्यात 173 षटकार
- निकोलस पूरन (वेस्ट इंडिज) – 98 सामन्यात 144 षटकार
- सूर्यकुमार यादव (भारत) – 72 सामन्यात 139 षटकार
- जोस बटलर (इंग्लंड) – 124 सामन्यात 137 षटकार