उद्योग खात्री योजनेतून काम हाती घेणार : बारा ग्रामपंचायत हद्दींमधून वाहणाऱया 29.7 कि. मी. नदीची होणार स्वच्छता : पावसाळय़ापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी धडपड

दीपक बुवा /बेळगाव
शहरातील उत्तर विभागाला सुजलाम सुफलाम करणाऱया मार्कंडेय नदीचे आता पुन्हा पुनःश्चेतन करण्यात येणार आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी उद्योग खात्रीतून हे काम करण्यात आले होते. आता पुन्हा या नदीची स्वच्छता आणि खोदाई व उंची वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. एकूण 29.7 किलोमीटरची खोदाई करण्यात येणार आहे. याद्वारे 12 ग्रामपंचायतींच्या हद्दीतून नदीची स्वच्छता करण्यात येणार आहे. याचा आराखडा तयार करण्यात आला असून कामाला चालना देण्यात येणार आहे. मात्र, नदीत पाणी असल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. येत्या आठवडाभरात हे काम सुरू होणार आहे.
अनेक शेतकऱयांना वरदान ठरणाऱया या नदीत महानगरपालिकेच्या हद्दीतील ड्रेनेज पाणी तसेच औद्योगिक वसाहतींचे पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे वाढता धोका ओळखून लोकप्रतिनिधींनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा सर्वात जास्त फटका ग्रामीण भागातील शेतकऱयांना बसणार आहे. सोडण्यात येत असलेल्या ड्रेनेज पाण्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यावर परिणाम होत असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी या नदीची खोदाई करून स्वच्छता केली होती. आता पुन्हा या नदीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याने काहीअंशी समस्या दूर होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.
नदीचा कायापालट करण्याचे स्वप्न
मार्कंडेय नदीच्या स्वच्छतेचा भार रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱयांनी उचलला आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत नदीचा कायापालट करण्याचे स्वप्न तालुका पंचायत अधिकाऱयांनी व्यक्त केले. यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सहा वर्षांपूर्वी तत्कालीन कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी नदीचा आराखडा तयार करून कामांना चालना दिली होती. आता पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मार्कंडेय नदी 46.5 कि. मी. लांब असून ती शिरूर धरणाला जाऊन मिळते. बेळगाव तालुक्मयातून 36.70 कि. मी. चा प्रवास ही नदी करते. आता त्यामधील 29.7 किलोमीटरचे काम उद्योग खात्रीतून करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण नदीची स्वच्छता मागील वेळेपेक्षा अधिक होत असून मागील वेळी मोठय़ा प्रमाणात काम करण्यात आले होते. होनगा ते बैलूरपर्यंत 7 किलोमीटर नदीतील काम करण्यात येणार नाही. कारण या ठिकाणी खडकाळ जमीन असल्याने या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.
पाणीसाठा अधिक उपलब्ध होणार
कित्येक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱया मार्कंडेय नदीला मनरेगातून स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. योजनेंतर्गत गाळ काढून व खोदाई करून पाणीपातळी वाढविण्यात येत आहे. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. यासाठी राज्य सरकारने मूलभूत सुविधा पुरविण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या नदीच्या स्वच्छता व खोदाई केलेल्या कामामुळे नदीच्या पाणी पातळीत यावर्षी काही प्रमाणात का होईना अधिक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे.
अधिकाऱयांची धडपड
ही नदी महाराष्ट्र हद्दीतून 9.5 कि. मी. वाहते. उर्वरित 4.5 कि. मी. नदीच्या पात्रात दगड आहेत. यामुळे या भागातील काम हाती घेण्यात आलेले नाही. उर्वरित 20 ते 30 कि. मी. मधील काम रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू करण्यात आले आहे. मात्र, नदीत पाणी असल्यामुळे काम करण्यास समस्या निर्माण होत आहे. पावसाळय़ापूर्वी हे काम पूर्ण करण्याची धडपड तालुका पंचायत अधिकाऱयांनी सुरू केली आहे.
मार्कंडेय नदीत सध्या रोजगार हमी योजनेंतर्गत हजारो कर्मचाऱयांनी काम केले आहे. यामध्ये कडोली, बेळगुंदी, बिजगर्णी, तुरमुरी, उचगाव, सुळगा, हिंडलगा, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बी. के., होनगा, काकती गावांच्या हद्दीतून वाहणाऱया या नदीच्या पात्राचे काम हाती घेण्यात येणार आहे. सध्या मार्कंडेय नदीपत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. नदीचे सध्या पात्र वाढविल्याने याचा फायदा नदी परिसरातील शेतकऱयांना होणार आहे. सुमारे 37 कि. मी. परिसरातील नदीकाठच्या 25 हून अधिक गावांना या पाण्याचा उपयोग होणार आहे. यासाठी विविध योजना राबवून शेतकऱयांना पाणी कसे देता येईल याचा विचार होणार आहे. यासाठी तालुका पंचायत अधिकाऱयांनी वेळोवेळी पाहणी केली आहे.
या नदीची रुंदी 10 मीटरपर्यंत करण्यात येणार आहे. 6 ग्रामपंचायतींनी या नदीपात्रातील काम व्यवस्थित केले नसल्यामुळे याकडे जातीने लक्ष देण्यात येणार आहे. एकूण 18 ग्रामपंचायतींचा यामध्ये सहभाग असणार आहे. बेकिनकेरे, बेनकनहळ्ळी, अगसगा, केदनूर, हंदिगनूर, बंबरगा या ग्रामपंचायतींच्या हद्दीतूनही नदी जात असली तरी स्वच्छता मोहिमेमध्ये त्यांचा समावेश केला नसल्याचे सांगण्यात आले.
पाणी जिरविण्यावर भर
नदीचे पात्र वाढवून अधिक तर पाणी जिरविण्याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देत आहे. यामुळे शेजारी असलेल्या विहिरींची पाणी पातळी वाढणार आहे. विहिरींची पाणी पातळी वाढली की शेतकरी अधिक पिके घेऊ शकतात. यासाठी अद्यापही नदीपात्र खोदाई करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने चालविला आहे. यासाठी छोटय़ा धरणांची उभारणी केली आहे. श्रमदान किंवा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कोणीही कामास पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तातडीने काम करण्यासाठी धडपड
सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आपली धडपड असणार आहे. शक्य तेवढय़ा लवकर आपण काम पूर्ण करण्यासाठी धडपड करणार आहे. याचबरोबर याद्वारे जिल्हय़ातील 17 हजारांहून अधिक कामगारांना काम मिळणार आहे.
तालुक्यातील या गावांतून होणार खोदाईचे काम
| ग्राम पंचायतीचे नाव | प्रत्येक गावातून होणार स्वच्छता |
| बिजगर्णी | 70 मीटर |
| बेळगुंदी | 1 कि.मी.40 मीटर |
| तुरमुरी | 2 कि.मी. 90 मीटर |
| उचगाव | 2 कि.मी. 40 मीटर |
| सुळगा | 1 कि.मी. 90 मीटर |
| हिंडलगा | 1 कि.मी. |
| आंबेवाडी | 5 कि.मी.40मीटर |
| कंग्राळी खुर्द | 3 कि.मी. 40 मीटर |
| कंग्राळी बुद्रुक | 2 कि.मी. 80 मीटर |
| कडोली | 4 किलो मीटर |
| काकती | 1 किलो मीटर |
| होनगा | 3 कि.मी. 10 मीटर |
मल्लिकार्जुन कलादगी यानी राबविला होता प्लॅन

2016-17 सालात मार्कंडेय नदीच्या स्वच्छतेबाबत गांभीर्याने घेऊन तत्कालीन कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी ही मोहीम लिलया पेलली होती. त्यांनी सुमारे 5 हजार कामगारांना काम देऊन नदीपात्राची खोदाई करवून घेतली. त्यानंतर ही मोहीम आता दुसऱयांदा राबविण्यात येत आहे.









