सरकारने अचानक बदल केल्याने पालकांतून नाराजी : अनेक विद्यार्थ्यांना फटका
बेळगाव : चालू शैक्षणिक वर्षापासून 6 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे. जे विद्यार्थी जून ते डिसेंबर 2019 दरम्यान जन्मले. व 2022 मध्ये एलकेजीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिलीला प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु याला पालकवर्गातून विरोध होताना दिसत आहे. अनेक विद्यार्थ्यांना वय भरत नसल्याने पुन्हा युकेजीलाच बसावे लागणार आहे.
मागील वर्षापर्यंत 5 वर्षे 10 महिने पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यालाही पहिलीला प्रवेश दिला जात होता. परंतु नव्या नियमावलीनुसार यात बदल करण्यात आला आहे. 6 वर्षे पूर्ण असतील तरच विद्यार्थ्याला पहिलीत प्रवेश द्या अशा सूचना शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शाळांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही दिवस कमी असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
सध्या शालांत परीक्षांना सुरुवात होणार असली तरी त्यापूर्वी एलकेजी, युकेजी व पहिलीच्या प्रवेशाची तयारी केली जात आहे. काही शाळांनी ऑनलाईन प्रवेशदेखील उपलब्ध करून दिले आहेत. पुढे दहावीच्या परीक्षेला अर्ज करताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे हा नवा बदल सूचविण्यात आला आहे. परंतु सरकारने अचानक बदल केल्याने पालक वर्गात नाराजी आहे. बेळगावमधील अनेक विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमुळे यावर्षी पुन्हा त्याच इयत्तेत बसावे लागणार आहे.
एसएटीएसमध्ये नोंद होत नाही
स्टुडंट अचिव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टम (एसएटीएस) अंतर्गत विद्यार्थ्याची ऑनलाईन नोंद करून घेतली जात आहे. विद्यार्थी सहा वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तर त्याची नोंद एसएटीएसमध्ये होत नाही. त्यामुळे तो विद्यार्थी जरी पहिलीच्या वर्गात बसला तरी त्याची नोंद कुठेही केली जात नाही. त्यामुळे बेळगावमधील शाळा सहा वर्षे पूर्ण असलेल्याच विद्यार्थ्यांना पहिलीसाठी प्रवेश देत आहेत.








