महामार्गावर बडेकोळ्ळमठ क्रॉसवर अपघातांची मालिका
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडीजवळच्या बडेकोळ्ळमठ क्रॉसनजीक रविवारी सायंकाळी अपघातांची मालिका घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघा जणांचा मृत्यू झाला. तर इतर वाहनातील चौघे जण जखमी झाले. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अपघात घडले आहेत. या विचित्र अपघातात एकूण सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. दोन दुचाकी, एक कार, एक आशयर व दोन ट्रक असे सहा वाहनांचे अपघात घडले आहेत. बेळगावहून हिरेबागेवाडीला जाताना महामार्गावरून सर्व्हिस रोडवर आयशर वाहन कलंडले होते. हा अपघात पाहण्यासाठी महामार्गावर आपली मोटरसायकल उभी केली होती. त्यांना एका ट्रकने धडक दिली.
त्यानंतर एकापाठोपाठ एक कार, मोटारसायकल आदी वाहनांमध्ये अपघातांची मालिकाच घडली. या अपघातात दुचाकीवरील शिवाप्पा चंबाप्पा शहापूर (वय 63) राहणार हुबळी व आणखी एका दुचाकीवरील रफिक जांबोटी (वय 30) राहणार नंदगड, ता. खानापूर या दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. मारुती दोड्डकल्लाप्पा पाटील (वय 46), केंपाण्णा बसवानी शिरगावी (वय 50) दोघेही राहणार सुरपूर, केरवाड व ट्रकचालक विजय रामचंद्र (वय 37) राहणार मध्यप्रदेश हे जखमी झाले आहेत. अपघात पाहण्यासाठी महामार्गावर थांबलेला चंद्रू (वय 26) जखमी झाला आहे. त्याच्याविषयी अधिक माहिती मिळाली नाही. सर्व जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक सुंदरेश होळ्याण्णावर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने ठरविण्यात आली. या अपघातांच्या मालिकेमुळे महामार्गावरील वाहतुकीला काही काळ व्यत्यय आला होता. पोलिसांनी त्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला. महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर अपघातग्रस्त वाहने विखुरली होती. जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले. महामार्गावरून सर्व्हिस रोडवर कलंडलेले वाहन बघण्यासाठी थांबल्यानंतर एकापाठोपाठ एक अशी अपघातांची मालिका घडली आहे. रात्री उशिरापर्यंत हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









