कोल्हापूर :
कानपूर (उत्तर प्रदेश) येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी रेल्वेने निघालेल्या शिवाजी विद्यापीठ संघातील 6 खेळाडूंनी पलायन केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समजते. खेळाडूंच्या पलायनबाबत संघ प्रशिक्षक व व्यवस्थापन पूर्णपणे अनभिज्ञ होते. कोल्हापुरातील स्थानिक संघ व स्पर्धेच्या प्रेमापोटी खेळाडूच माघारी परतल्याची चर्चा मंगळवारी कोल्हापूरी फुटबॉल विश्वात जोरात सुरु होती.
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत अफलातून कामगिरी कऊन शिवाजी विद्यापीठ संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. या संघात कोल्हापुरातील स्थानिक नामवंत फुटबॉल संघातील खेळाडूंचा समावेश आहे. नियमानुसार पश्चिम विभागीय स्पर्धेत जो संघ असतो तोच संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत दाखल करावा लागतो.
त्यानुसार संघ कानपूरमधील अखिल भारतीय स्पर्धेसाठी रेल्वेने निघाला होता. स्पर्धेला जाण्यासाठी संघातील सहा खेळाडूंनी आपल्या नोकरीवर रजा टाकली होती परंतू रजा न मंजूर झाल्याने सहाही खेळाडूंनी स्पर्धेत खेळण्यासाठी असमर्थता दाखवली होती. त्यामुळे 16 खेळाडूंची संघ रेल्वेने कानपूरकडे रवाना झाला होता. त्यामुळे स्थानिक स्पर्धेतील काही संघांचे सामनेही स्थगित केले. परंतू 16 पैकी 6 खेळाडू कानपूर या स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले नसल्याचे समजते. हे सहाही खेळाडू स्थानिक संघातून स्थानिक स्पर्धा खेळत आहेत. रेल्वे प्रवासामध्ये काही खेळाडू हे पुण्यात तर काही खेळाडू हे पुढील स्टेशनवर उतरले आहेत, असेही समजते. खेळाडूंनी प्रत्यक्ष माघारी परतण्याचे नेमके कारण काय आहे, हे त्यांनी बोलल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.








